दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२३ | फलटण |
वडजल, तालुका फलटण गावच्या हद्दीत ज्ञानराज हॉटेलच्या समोर काल दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या गाडीचालकाने पहिल्यांदा रस्त्यावरील दुभाजकाला धडक देऊन दुसर्या बाजूला जाऊन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद अनिकेत चव्हाण (रा. कालगाव, ता.कराड) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या अपघाताची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवार, दि. २५ मार्च रोजी वडजल गावच्या हद्दीत ज्ञानराज हॉटेलच्या समोर दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या गाडीचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालवून प्रथम डीवाईडरवर घालून नंतर दुसर्या बाजूस राँग साईडला येऊन समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पृथ्वीराज संभाजी चव्हाण व ओमकार युवराज चव्हाण (दोघेही राहणार कालगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा) हे जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या अपघात प्रकरणी गाडीचालक आकाश पोपट गावडे (राहणार बरड, तालुका फलटण, जिल्हा सातारा) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करीत आहेत.