दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । लोणंद । लोणंद येथे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या घटनांत एका विवाहीतेने व एका वृद्धाने अशा दोघांनी आत्महत्या केल्या असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे.
लोणंद येथील शास्त्रीचौक परिसरातील वीस वर्षीय विवाहिता शुभांगी रोहन माने हिने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहीती घटनास्थळावरून मिळाली आहे. शुभांगी हिचे माहेर शाहूपुरी सातारा येथील असून ती एक दिवस आधीच माहेराहून सासरी आल्याचे समजते घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट देऊन लोणंद पोलिसांना तपासा संदर्भात सूचना दिल्या .
दुसऱ्या एका घटनेत लोणंद फलटण रोडवरील बाळासाहेब नगर येथील मनोहर खरात या आजाराने त्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तिनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदर घटनास्थळी लोणंद पोलिस दाखल झाले आहेत.
सदर दोन्ही प्रकरणी लोणंद पोलिसांकडून घटनास्थळी त्यात दिवशी रात्री ऊशीरा पंचनामा करण्यात येऊन लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस करीत आहेत.