फलटणमध्ये बहिणींनी साकारली लोहगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती; ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा प्रयत्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या सुट्टीत ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी फलटणमधील दोन बहिणींनी आपल्या कल्पकतेतून घरगुती लोहगड किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने फलटणमधील कु. ऋतुजा रामचंद्र मुळे आणि कु. पूजा रामचंद्र मुळे या दोन बहिणींनी घरगुती लोहगड किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. शुक्रवार पेठेतील रामेश्वर चौक परिसरातील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या या दोघींनी आपल्या कल्पकतेतून व मेहनतीतून हा किल्ला तयार केला आहे.

हा किल्ला तयार करताना त्यांनी विशेष मेहनत घेऊन किल्ल्याची रचना, तटबंदी, बुरुज तसेच ऐतिहासिक वैशिष्ट्ये अचूकपणे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हा किल्ला बनविण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन व पूर्ण साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळे आणि दोघींच्या उत्साहामुळे हा सुंदर किल्ला साकार झाला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वारसा जतन

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लोहगड हा ऐतिहासिक किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३,४०० फूट उंचीवर असलेला हा किल्ला आपल्या भक्कम तटबंदी, भव्य प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते. लोहगडावरील प्रसिद्ध विंचूकडा हा त्याच्या आकर्षणाचा मुख्य भाग असून मराठ्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला आजही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो.

या उपक्रमातून नवीन पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची माहिती मिळावी, त्यांचा इतिहास समजावा आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, हा सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व इतिहासप्रेमी, नागरिक, लहान मुले व शिवप्रेमींनी या घरगुती लोहगड किल्ल्याला आवर्जून भेट देऊन किल्ल्याची पाहणी करावी, असे आवाहन किल्ला तयार करणाऱ्या मुळे कुटुंबातर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!