दैनिक स्थैर्य | दि. 17 सप्टेंबर 2024 | फलटण | आजवर तालुक्यात जल क्रांती, औद्योगिक क्रांती व फलटण तालुक्याचा कायापालट हा श्रीमंत रामराजे यांनी केला आहे! हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी भान ठेवून आरोप करावेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही!; असे मत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना खानविलकर म्हणाले की; कमिन्स कंपनी ही इंटरनॅशनल कंपनी असल्यामुळे ती सर्व नियमानुसारच चालते. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही. जर कमिन्स कंपनीमध्ये राजकीय हस्तक्षेप चालत असता तर उपहारगृहाचे कॉन्ट्रॅक्ट हे तुमच्या गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाले नसते. आमचे नेते श्रीमंत रामराजे साहेबांच्या प्रयत्नांमुळेच कमिन्स कंपनी ही फलटण तालुक्यात आलेली आहे. त्यामुळेच फलटण तालुक्याचे नंदनवन झाले आहे. कमिन्स कंपनीमध्ये जे कामगार काम करत आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे व पोस्ट प्रमाणे वेतन मिळत आहे. निवडणूक जवळ आली आहे; म्हणून मुद्दामून विरोधकांच्या माध्यमातून बिनबुडाचे आरोप अनुप शहा करीत आहेत; असेही खानविलकर यांनी स्पष्ट केले.
जनतेने तुमची जागा लोकसभा निवडणूकीत दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणूकीतही जनता तुम्हाला कात्रजचा घाट दाखवून देणार आहे. तुमच्या गटाच्या कार्यकर्त्यांची यादी काढली तर त्यात बहुतांश कार्यकर्ते हे खून, खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागणे आणि हनीट्रॅप यांच्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित केले तर तुमचा नेता हा 100 तोंडांचा रावण होईल. अनुप शहा यांनी नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये आरोग्य कडे लक्ष द्यावे असा उपरोधिक टोला सुद्धा खानविलकर यांनी लगावला.