
दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२६ | सातारा |
जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार असलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने पकडले असता त्याच्याकडे देशी बनावटीची ३ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी सातार्यातील मोळाचा ओढा येथे ही कारवाई करून एकूण ३ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महेश गणपत इंगळे (वय २७, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात विनापरवाना बंदूक बाळगणारांची संख्या अधिक असल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. याबाबत पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना २८ ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तयार करून मोळाचा ओढा येथे शोधमोहीम राबविण्यात आली.
एलसीबी पोलिसांना करंजे येथील महानुभव मठाजवळ रोडवर एकजण संशयितरीत्या दुचाकीवरून फिरत असल्याचे दिसला. त्यानुसार संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे हत्यारे सापडू लागल्या. त्याच्याकडे एकूण ३ देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह, ३ जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व मोटारसायकल असा मुद्देमाल सापडला.
संशयिताकडे शस्त्रसाठा सापडल्याने पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता संशयित आरोपीला सातारा जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार केला असल्याची माहिती मिळली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत यादव, रोहित फार्णे, फौजदार परितोष दातिर, चंद्रकांत पुजारी, पोलिस राजू मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, इरफान मुलाणी यांनी कारवाईत सहभाग घेतला.