
दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२६ | सातारा |
खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे उदयनराजे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संशयिताला पुढील २४ तासांत ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
संबंधित आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री उदयनराजे समर्थक सातारा शहर पोलिस ठाण्याच्या आवारात एकत्र आले. आक्रमक समर्थकांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची मागणी केली. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे गुन्हा नोंदवण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले, ज्यामुळे पोलिस ठाणे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी संबंधिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला. याबाबतचे निवेदन उदयनराजे समर्थकांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना सुपूर्द केले.
यावेळी नियोजन सभापती अशोक शेडगे, स्वीकृत नगरसेवक पंकज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विजय गाडवे, गणेश दीक्षित, समीर माने, मोटू मतकर, बजरंग दल शहराध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, पोलिसांनी २४ तासांत संशयिताला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जर संबंधित संशयित समर्थकांच्या समोर आला, तर त्याला उदयनराजे समर्थकांच्या स्टाईलने उत्तर देऊ. छत्रपती घराणे आणि महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर चुकीच्या कमेंट करणार्यांना यापुढे जागीच उत्तर दिले जाईल.
