फलटणच्या तडीपार तरुणाकडून तीन पिस्तुले जप्त; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेने फलटणमधील तडीपार तरुणाला ताब्यात घेऊन तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, दुचाकी व मोबाईल असा ३ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थैर्य, सातारा, दि. २९ ऑगस्ट : फलटणमधील तडीपार तरुणाला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने करंजे परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ३ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. महेश गणपत इंगळे (वय २७, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.

पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

२८ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदाराकडून फलटण परिसरातील एक व्यक्ती शाईन दुचाकीवरून करंजे येथील महानुभव मठाजवळ देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.

रात्री ८.१० वाजता सापळा रचून ताब्यात

या माहितीच्या आधारे सातारा शहरात गस्त घालणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संबंधित परिसरात सापळा रचून खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पथकाने महानुभव मठाजवळील रस्त्यावर सापळा रचला.

रात्री सुमारे ८ वाजून १० मिनिटांनी माहितीतील व्यक्ती दुचाकीवरून आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मॅगझिनसह तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि दुचाकी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन वर्षांसाठी तडीपार असल्याचे तपासात समोर

संबंधित व्यक्तीबाबत अधिक माहिती घेतली असता तो सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार असल्याचे समोर आल्याचे पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर, चंद्रकांत पुजारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

कारवाईत राजू मुलाणी, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, इरफान मुलाणी, संकेत निकम, चालक अकबर खान तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे अमोल घाडगे सहभागी झाले होते.

Back to top button
Don`t copy text!