
फलटणमधील दोन शाळांतील ३३ बेंच चोरीला गेल्याची तक्रार प्राचार्यांनी पोलिसांकडे दिली. चोरीला गेलेल्या बेंचची किंमत ३ लाख ६३ हजार रुपये आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमधील तब्बल ३३ बेंच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या बेंचची एकूण किंमत ३ लाख ६३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी प्राचार्य निलम गायकवाड यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, रोहित मनोज शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी तरुणावर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वॉचमनला दिसले दोन तरुण; पाहणी केल्यानंतर चोरी उघड
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आवारात यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज आणि नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. संस्थेच्या सुरक्षेसाठी नाना पाटील चौकाच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमनची व्यवस्था आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत रविंद्र रासकर आणि प्रमोद चोरमले ड्युटीवर होते. त्यावेळी रोहित शिंदे आणि त्याच्यासोबत आणखी एक तरुण खिडकीतून आत पाहत असल्याचे त्यांना दिसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वॉचमनने विचारणा केल्यानंतर दोघे तेथून निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर शाळेची पाहणी करताना टेक्निकल विभागाच्या इमारतीतील मेकॅनिकल विभागाच्या खोलीचा दरवाजा तुटलेला आढळला. खोलीत गेल्यानंतर बेंच अस्ताव्यस्त असल्याचे आणि काही बेंच कमी असल्याचे लक्षात आले. याची माहिती प्राचार्य निलम गायकवाड यांना देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे २०, वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलचे १३ बेंच गायब
माहिती मिळाल्यानंतर प्राचार्य गायकवाड शाळेत पोहोचल्या. बेंचची मोजणी केली असता यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील २० आणि सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमधील १३ असे एकूण ३३ बेंच गायब असल्याचे निदर्शनास आले.
चोरीला गेलेल्या प्रत्येक बेंचची अंदाजे किंमत ११ हजार रुपये असून, त्यांना लोखंडी पाय आणि वरच्या बाजूस लाकडी डेस्क असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ३३ बेंचची एकूण अंदाजे किंमत ३ लाख ६३ हजार रुपये आहे.
रोहित शिंदे व अनोळखी तरुणावर संशय
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत मेकॅनिकल विभागाच्या बंद खोलीतून हे बेंच चोरीला गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. रोहित शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी तरुणावर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर शाळेच्या समितीशी चर्चा करून फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीतील आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. रोहित शिंदे याच्याविरोधात पूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी याबाबत सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.