स्थैर्य, फलटण, दि. २०: फलटण शहरामध्ये विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
राजू राम बोके, वय ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण हा त्याच्या दोन साथीदारांसह फलटण येथे मित्राला भेटण्यास येणार आहे व तो जवळ विना परवाना पिस्तुलही बाळगत आहे. यावरुन फलटण शहर पोलिसांनी फलटण शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे गुरुवार दि. २० मे रोजी मध्यरात्री सापळा लावला. तेव्हा मध्यरात्री पावने एकच्या सुमारास राजू राम बोके वय ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण, दिलीप तुकाराम खुडे वय ३२ रा. लक्ष्मीनगर, फलटण, मनोज राजेंद्र हिप्परकर वय २७ रा. प्रेमलाताई हायस्कूल जवळ मलठण हे एका दुचाकीवरुन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतली असता राजू राम बोके याने त्याच्या कमरेला पिस्तूल खोचून ठेवलेले दिसले. सदर पिस्तूल ताब्यात घेवून त्यामधील मॅगझीन काढून पाहिले असता त्यात एक जिवंत काडतूस मिळून आले. सदर पिस्तूलाबाबत बोके याचेकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी पोलिसांनी बोकेसह अन्य दोघांनाही जागेवरच अटक केली व त्यांच्याकडे असलेली दुचाकी व तीन मोबाईल जप्त केले. संबंधितांविरुध्द भारतीय हत्यार अधिनियमासह अन्य कलमान्वये फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदर तिनही संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार दि. २४ मे पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सपोनि एन आर गायकवाड हे करीत आहेत.