उद्यानदूतांचा बरडमध्ये मुक्काम; शेतकऱ्यांना मिळणार कृषी तंत्रज्ञानाची जोड

फलटण येथील उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बरडमध्ये स्वागत. हे विद्यार्थी पुढील दहा आठवडे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम राबवणार आहेत.

स्थैर्य, बरड, दि. २७ जून : ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे (उद्यानदूत) बरड गावात स्वागत करण्यात आले. हे विद्यार्थी पुढील दहा आठवडे गावात राहून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम राबवणार आहेत.

या स्वागत कार्यक्रमाला सरपंच प्रकाश लंगुटे, ग्रामपंचायत सदस्य करीम शेळ, ज्ञानदेव निगडे यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी शिक्षणाचा थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन

पुढील दहा आठवड्यांमध्ये उद्यानदूत विनीत कळमकर, तेजस डोंगरे, रोहित राऊत, स्वयंम गराडे, केशवराव जाधव आणि आदित्य भोसले हे ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम राबवणार आहेत. यामध्ये शेतीविषयक प्रात्यक्षिके, जनावरांचे लसीकरण, शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील चर्चा, गटचर्चा आणि शिवार भेटींचा समावेश आहे. यासोबतच, विद्यार्थी शेतकऱ्यांचे अनुभव आणि त्यांच्या पारंपरिक शेतीपद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यासही करणार आहेत.

या संपूर्ण उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. एस. लेंभे आणि डॉ. ए. टी. पाटील यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती यांचा उत्तम समन्वय साधला जाण्यास मदत होईल.

Back to top button
Don`t copy text!