
फलटण शहरातील माळजाईप्रमाणे आता नाना पाटील चौक ते कोळकीपर्यंत आकर्षक पथदिवे बसवण्याचा मोठा निर्णय नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २७ जून : फलटण शहरातील माळजाई येथे बसवलेल्या आकर्षक पथदिव्यांच्या धर्तीवर आता शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर एकसारखे पथदिवे बसवले जाणार आहेत. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या कामाचे आदेश दिले असून, नुकतीच या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
शहरातील नाना पाटील चौक ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (पृथ्वी चौक) आणि तेथून कोळकी येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (शिंगणापूर चौक) या मुख्य मार्गावर सलग एकसारखे पथदिवे बसवण्यात येणार आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या कामाच्या नियोजनासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात कंत्राटदार प्रतिनिधी श्री. त्यागी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, देविदास पाटील आणि कंत्राटदार दीपक देशमुख उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, गिरवी नाका ते महात्मा फुले चौक या मार्गावर बसवण्यात आलेल्या पथदिव्यांना नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकांची ही पसंती लक्षात घेऊन आता शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर अशाच प्रकारचे अद्ययावत पथदिवे बसवण्यात येणार आहेत. ही केवळ बदलाची सुरुवात असून येणाऱ्या काळात फलटण शहराचा चेहरामोहरा नक्कीच बदललेला दिसेल, असा विश्वास समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
