संवेदना हरवलेला देश ही प्रतिमा होऊ नये. – राजेंद्र शेलार, सातारा


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आणि देशाचे राजकारण एकदम तापले. उलटसुलट बातम्यानी खरे काय नी खोटे काय समजेनासे झाले. नेमक्या त्याचवेळी तेथील घटनेचा चोवीस सेकंदाचा एक व्हिडीओ पाहिला आणि भारतीयांच्या सामाजिक जाणिवा संपल्या की काय अशी शंका मनात येऊन गेली. वास्तव कितीतरी वेगळं असूनही अगोदरच्या चर्चा मात्र भलतेच दर्शवित होत्या. एकवेळ राजकारण्यांच समजू शकतो, पण या सुसंस्कृत देशातील प्रसार माध्यमे आणि जनताही एवढी निर्ढावल्यासारखी वागू शकते हे पाहून आश्चर्य वाटले. असं म्हणतात, की ज्या समाजात संवेदना शिल्लक नाहीत तो समाज फार काळ टिकून राहू शकत नाही. साहजिकच मनात प्रश्न उभा राहतो की, या देशातील असंघटित शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे कसे होणार? त्यांना संरक्षण कोण देणार? कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याची आणि प्रत्येक घटनेकडे राजकीय नजरेने पाहण्याची समाजाची वृत्ती बळावली आहे. इतकी की, माणसांचे मृत्यूही आपण आता राजकारणाचे आखाडे बनवू लागलो आहोत. मेलेली व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाची होती हे पाहून आपण आपल्या भावना ठरवू लागलो आहोत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ समोर आला. तो अतिशय भयावह होता… ज्यात एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर पाठीमागून गाडी घालून त्यांना चिरडले आहे. त्यात चार शेतकरी ठार झालेत आणि असे सांगितले जाते की, याचा बदला घेण्यासाठी काही लोकांनी त्या पक्षाच्या (भाजपा) दोन कार्यकर्त्यांना ठार मारले. याशिवाय रिपोर्टींगसाठी गेलेला एक पत्रकार व एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण हे अजून समोर आलेले नाही. अशाप्रकारे आठ लोक नाहक बळी जातात, अत्यंत अमानुषपणे लोकांना चिरडून मारले जाते. मात्र संवेदना हरवलेले लोक या घटनेचा राजकीय आखाडा बनवतात. अलीकडच्या काही वर्षात असे सातत्त्याने घडत आहे. बरं, यावर काही बोलण्याचीही सोय राहिली नाही. अशा घटनेबद्दल सोशल मीडियावर तुम्ही साधी हळहळ जरी व्यक्त केली तरी संबंधित पक्षाने पोसलेले ‘नेटकरी’ तुमच्यावर तुटून पडतात. मागील कुठलेतरी दाखले देऊन तुम्हालाच नालायक ठरवतात. लखीमपूर खीरी घटनेबद्दल तेच सुरु आहे.

या भयानक घटनेची माहिती देताना स्वतःच तपास यंत्रणा असल्यासारखे निष्कर्ष प्रसार माध्यमे सांगू लागली आहेत. आंदोलन करणारे शेतकरी नव्हतेच, तर ते दंगल करण्यासाठी आणलेले गुंड होते असा डांगोरा पिटण्याचे काम माध्यमेच करीत आहेत. तो चोवीस सेकंदाचा व्हिडीओ पाहिला आणि चिरडून मेलेल्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली तर स्पष्ट होते ते शेतकरीच होते आणि शांतपणे आंदोलन करत होते. या घटनेत ठार झालेल्या शुभम नावाच्या युवकाचे घर पाहून आणि त्याच्या आईवडिलांचा आक्रोश पाहून कोण म्हणेल आंदोलन करणारे शेतकरी नव्हते? दंगेखोर जेंव्हा एखाद्या आंदोलनात घुसतात तेंव्हा ते स्वतः मरत नाहीत, इतरांना मारतात हे न समजण्याइतका भारतीय मीडिया अडाणी नाही. पण जेंव्हा तुम्ही डोळ्यांना झापडं लाऊन एकच बाजू धरलेली असते तेंव्हा हे असेच घडणार. तर्क वितर्क मांडून लोकांची दिशाभूल केली जाणार. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला दिसत असतानाही आपण समाज म्हणून काही प्रतिक्रिया देत नाही हे फारमोठे दुर्दैव आहे. मंत्र्याच्या मुलाच्या सहभागाबद्दल खात्री वाटण्याचे कारण म्हणजे घटना घडली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या जबाबदार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्र्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा (FRI) दाखल करुन घेतला. या FRI चे गांभीर्य लक्षात आल्यावर सरकारची आणि सत्ताधारी पक्षाची धावपळ सुरु झाली. सारवासारव करण्यासाठी माध्यमे हाताशी धरणे आणि आरोप-प्रत्यारोप करणे सुरु झाले. ठार झालेल्या लोकांबद्दल कोणालाही फारसी सहानुभूती असल्याचे जाणवले नाही. प्रत्येकजण आपल्या पक्षाचे राजकारण रेटायचे काम करीत आहे आणि त्यासाठी कोणत्या थराला जायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी त्याच राज्यात (उत्तर प्रदेश) ‘आझादी का अमृत महोत्सवी जश्न’ मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यांच्या स्वागतासाठी लाल गालिच्या अंथरला जातो, संगीताची मैफिल होते आणि त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते. हे कशाचे द्योतक आहे.? कार्यक्रम रद्द केला असता तर आकाश कोसळले नसते. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे संपूर्ण दौऱ्यात पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. आपल्याच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांचा हकनाक बळी गेला याचे त्यांना दुःख वाटत नाही, कसलीही संवेदना ते व्यक्त करत नाहीत. पंतप्रधानांसारखी व्यक्ती जेंव्हा एवढी उदासीन वागते तेंव्हा काही प्रश्न उपस्थित होतात. या देशात ‘आझादी’ नावाची गोष्ट आपण शिल्लक ठेवली आहे का? सामान्य माणसाचा आवाज दाबून तर टाकला नाही ना?

दुसरीकडे, जेव्हा प्रियांका गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात होत्या, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.. असाच प्रयत्न करणाऱ्या सचिन पायलट यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांनाही अटक केली… माहौल बिघडू नये म्हणून आम्ही तेथे कोणाला जाऊ देणार देणार नाही अशा गोंडस भाषेत सरकारने जमावबंदी आदेश लागू केला. शेजारील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाकारला. त्यांनी विमानतळावरच सत्याग्रह सुरु केला तरी त्यांना लखीमपूर खीरीला जाण्याची परवाणगी मिळाली नाही. या अराजकतेला, हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. सद्यस्थितीला जेव्हा भाजप सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे, तेव्हा हे सरकार अशा असंविधानिक राजकारणावर उतरले आहे. लोकशाही राष्ट्र म्हणून मिरवणाऱ्या भारतीयांनी याकडे केवळ राजकारण म्हणून पाहू नये.


Back to top button
Don`t copy text!