उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रसिद्धी माध्यमांमध्ये पेरलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाने प्रेरित

आयकर विभागाच्या कारवाईशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नाही

आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देणार

दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!