तरुणीने ऑनलाईन शिक्षणासाठी गावाजवळील डोंगरात बांधली झोपडी


 

झोपडीत बसून ऑनलाईन शिक्षण 

स्थैर्य, सातारा, दि. ०७ : अन्न, वस्त्र , निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा जरी असल्या तरी सध्या मोबाईल व नेटवर्क ही सुध्दा मुख्य गरज बनली आहे. कोरोना लॉकडाऊन नंतर अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. टप्प्या टप्प्या ने काही महत्वाचे व्यवहार व इतर आवश्यक बाबी सुरु होत आहेत . मात्र मंदिरे व शाळा, कॉलेज आजही बंदच आहेत. शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु आहे. परंतू यासाठी मोबाईल व नेटवर्क या दोन बाबी खूप महत्वाच्या आहेत. काही गरीब पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाहीत तर काही ठिकाणी नेटवर्क नाही. म्हणून केळघर सोळशी या जावली तालुक्यातील गावात राहणाऱ्या व मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयात शिकत असलेल्या श्वेता संजय आटाळे या तरुणीने ऑनलाईन शिक्षणासाठी गावाजवळील डोंगरात झोपडी बांधली आहे .

आजही विज्ञान व तंत्रज्ञान युगात सर्व शोध लागले. माणूस चंद्रावर पोहोचला असला तरी तापोळा बामणोली कास सारख्या दुर्गम भागात आजारी पेशंट, गरोदर स्त्रीया यांना डोलीतून न्यावे लागते, पावसाळ्यासाठी चा चार महिन्यांचा अन्नधान्य साठा करुन ठेवावा लागतो तसेच मोबाईल रेंज साठी कोठे झाडावर , टेकडीवर जावे लागते. केळघर सोळशी या जावली तालुक्यातील गावात राहणाऱ्या व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या श्वेता आटाळे या तरुणीने ऑनलाईन शिक्षणासाठी गावाजवळील डोंगरात झोपडी बांधली आहे . शिक्षक असलेल्या संजय आटाळे या तिच्या वडिलांनी तिला झोपडी बांधण्यासाठी मदत केली . सध्या ती दिवसभर या झोपडीत बसून ऑनलाईन लेक्चर अटेंड करते. तसेच या गावातील अक्षय शिंदे , पूजा शिंदे हे कंपनीचे ऑनलाइन काम ही या झोपडीत बसून करत आहेत. त्यामूळे तिलाही सोबत मिळत आहे. डोंगरात बांधलेल्या झोपडीमुळे ऊन , वारा , पाऊस यापासून संरक्षण होते तसेच या बांधकामासाठी बांबू व प्लास्टिक कागद यांचा वापर केला आहे. शिवाय उंचावर ज्या ठिकाणी चांगली रेंज येते त्या स्पॉटची निवड केली आहे.

तापोळा, बामणोली व कास परिसरात अनेक गावे दुर्गम अशा द-या खोऱ्यात वसलेली आहेत . या विभागात तापोळा येथे एकमेव बी एस एन एल या कंपनीचा टॉवर आहे . या परिसरातील सुमारे एकशे पाच गावच्या लोकांना या टॉवरवरच अवलंबून रहावे लागते . उत्तेश्वर व अंधारी येथे ही भारत संचार निगम कंपनीचे टॉवर आहेत .परंतू त्यांची प्रसारण क्षमता खूपच कमी आहे .लॉक डाऊनमुळे शहरातील लोक गावाला आले त्यामुळे ग्राहक संख्या वाढल्याने नेटवर्क स्पीड कमी झाले . मधूनच दिवस, दिवस रेंज गायब होते त्यामूळे विद्यार्थी व ऑनलाईन जॉब करणारे यांना उंच डोंगरावर जाणे , उंच झाडावर जाणे , टेकडीवर पोहोचने किंवा जेथे रेंज येते त्या गावात जाणे हे पर्याय निवडावे लागतात .

“मी माझ्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी पर्याय म्हणून डोंगरात झोपडी बांधण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे तिला तेथे थोडया प्रमाणात रेंज मिळते परंतू बी .एस.एन.एल कंपनी फोर जी नसल्यामुळे खूप वेळ वाया जातो .आमच्या तापोळा , बामणोली विभागात वाय . फाय तसेच फोर .जी . नेटवर्कची खूप गरज आहे . त्यामुळे विद्यार्थी वर्गासह इतरांनाही त्याचा फायदा होईल .. ” – संजय आटाळे , पालक केळघर सोळशी 

“लॉकडाऊन मुळे मी मार्च महिन्यापासून माझ्या मुळ गावी केळघर सोळशी येथे राहत आहे . माझ्या दंत महाविद्यालयाची लेक्चर्स मला कमी रेंजमुळे काही दिवस अटेंड करता आली नाहीत .मी फारच दुःखी व नाराज झाले. माझ्या मनावर फार मोठा ताण आला .यानंतर मी वडिलांना सांगितले आपण डोंगरावर झोपडी बांधू . वडिलांनी मदत केली .आता मी झोपडीत बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहे .. -”श्वेता आटाळे , विद्यार्थीनी , (शासकीय दंत महाविद्यालय , मुंबई.)


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!