माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे : भारत सासणे


दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२२ । पोंभुर्ले । ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी गेली 35 वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील पत्रकारिता व साहित्य क्षेत्राला अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करुन बाळशास्त्रींचे कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे अशी अपेक्षा 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 176 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सासणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. कार्यक्रमास कोकण प्रादेशिक पर्यटन विकास समितीचे नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे प्रमुख सतीश मदभावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोंभुर्ले येथील स्मारक व गाव राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार मॉडेल व्हावे अशी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्यातील पत्रकार व साहित्यिक यांनी यासाठी एकत्रितपणे सहकार्य करावे. या गावी आणखी मोठे सभागृह, ग्रंथालय व्हावे. त्यातून दिशादर्शक अशी विविध प्रश्‍नांवर चिंतन शिबीरे व्हावीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजी – माजी अध्यक्षांची व्याख्याने आयोजित करावीत, असेही भारत सासणे यांनी यावेळी सूचित केले.

संदेश पारकर म्हणाले, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिता, लोकशिक्षण, ग्रंथ लेखन, इतिहास संशोधन, पुरातत्त्व लेखन, समाज प्रबोधन कार्य फक्त कोकणालाच नाही तर महाराष्ट्राला, देशाला अभिमानास्पद असे आहे. त्यामुळे रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पोंभुर्ले येथे उभारलेले बाळशास्त्रींचे स्मारक व पोंभुर्ले गावाचा विकास पर्यटन क्षेत्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने या गावाचा विकास आराखडा निश्‍चित करुन आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देऊ. पोंभुर्लेचे सरपंच सादीक डोंगरकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर व जांभेकर कुटुंबिय यांनी एकत्रित बसून याबाबतचा आराखडा पर्यटन विकास समितीकडे सादर करावा, असेही पारकर यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्याचा आढावा घेवून पोंभुर्ले हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे. येथील ‘दर्पण’कारांच्या स्मारकाचा विकास व विस्तार व्हावा याविषयी अपेक्षा व्यक्त केल्या.

संस्थेच्यावतीने प्रतीवर्षी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या सन 2022 च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा रविंद्र बेडकिहाळ यांनी या समारंभात केली. यामध्ये धाडसी महिला पत्रकार पुरस्कार – सौ.शीतल करदेकर (विशेष प्रतिनिधी, दै.वृत्तमानस, मुंबई), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – अनुराधा कदम (उपसंपादक, दै.तरुण भारत, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – प्रल्हाद उमाटे (जिल्हा प्रतिनिधी, दै.मराठवाडा नेता, नांदेड), विदर्भ विभाग – प्रा.डॉ.राजेंद्र मुंढे (ज्येष्ठ पत्रकार, वर्धा), उत्तर महाराष्ट्र विभाग – जयप्रकाश पवार (निवासी संपादक, दै.दिव्य मराठी, जळगाव), कोकण विभाग – शैलेश पालकर (संपादक, महावृत्त डॉटकॉम, रायगड), सुरेश कौलगेकर (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, वेंगुर्ला), विशेष दर्पण पुरस्कार – किरण बोळे, (प्रतिनिधी, दै.सकाळ, फलटण), स.रा.मोहिते (प्रतिनिधी, दै.जनमत, फलटण) यांचा समावेश असून या पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी 6 जानेवारी 2023 रोजी समारंभपूर्वक होणार असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्रींची प्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन होवून सभागृहातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बाळशास्त्रींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘दर्पण’ सभागृहात लोकशिक्षणकार कै.ग.गं.जांभेकर, मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार कै.जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ, परखड संपादक कै.प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण भारत सासणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास पत्रकार संतोष कुळकर्णी, निकेत पावसकर, सौ.सासणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, शाहीर कांबळे यांच्यासह श्रावणी कंप्युटर एज्युकेशन (तरेळे) चे विद्यार्थी, देवगड तालुक्यातील पत्रकार, पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त अमर शेंडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!