स्रीला हवा योग्य सन्मान


स्थैर्य, दि.९: स्त्रीशिवाय अवघे जगच अपूर्ण आहे.इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते.कुटुंबाच्या प्रगतीशील वाटचालीसाठी आजीवन झटते.स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई,आजी,पत्नी,बहिन, मुलगी व आदर्श गृहिणी अशा अनेक विविध भूमिका बजावणारी आमच्यासाठी राबराब राबणारी ख-या अर्थाने माता हे विशेषण पात्र ठराविणारी आजची महिला कोणत्याही क्षेत्रांत आघाडीवरच दिसते. स्त्रीला शतकानुशतके संघर्ष करुन स्वतःच्या अस्तित्वासाठी अहोरात्र कष्ट करावे लागले.सीता,रुक्मिणी,सावित्री अशा अनेक रुपाने स्त्रियांची संघर्षमय वाटचाल आपण अनुभवलीच आहे.अनेकदा कवी च्या लेखनीतून,ओव्यांतून स्रीवाद रेखाटला गेलाय.भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान असल्याने स्त्रियांना ऐतिहासिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे.यातूनच स्त्रीचे विद्रोही रुप जन्मास आले.आज पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देऊन महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.पुरुषांपेक्षाही अनेक क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. स्वातंत्र्य काळातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून आजच्या काळातील प्रतिभाताई पाटील यांच्या पर्यंत महिलांनी वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.मानवतेचे रक्षण करुन नोबेल पारितोषिकापर्यंत मजल मारून स्त्रियांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणा-या मदर तेरेसा यांना कितीही सलाम केला तरीही अपूर्ण ठरतो.आंतराळवीर कल्पना चावला,सुनिता विल्यम्स कायमच अजरामर राहतील. छत्रपतींना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या देवी होळकर, आदर्श पत्नीधर्म निभावणा-या सईबाई, पतीच्या संघर्षाची झालर लाभलेल्या येसूबाई, भारतीय राजकारणात दूरदृष्टी असणाऱ्या,सर्वसामान्य जनमानसांचे हित जोपासणा-या इंदिरा गांधी यांच्या अस्तित्वास कोणतीच लेखनी पूर्णपणे लिहू शकत नाही. बहिणाबाईं,मुक्ताबाई यांचे काव्य, दुर्गा भागवत,इरावती कर्वे,शांता शेळके, मालतीबाई बेडेकर यांच्या लेखनातून

सर्जनशील,वैचारिक,प्रतिकारी अशा स्त्रियांचे दर्शन घडले.. बुद्धी,भक्ति,शक्ती अन् युक्तीच्या प्रतिक असणाऱ्या  सरस्वती,दुर्गा,लक्ष्मी,पार्वती,माता भवानी यांना नतमस्तक होताना सा-यांनाच धन्य वाटते. अशा स्री संस्कृतीला आजन्म जोपासना करुन प्रगतीशील समाज निर्मितीसाठी महिलांचा योग्य सन्मान व्हायला हवा.आजच्या युगात स्ञी अनेक क्षेञात  आपले कर्तुत्व सिद्ध  केले असले तरी तिला अनेक समष्यांना सामोरे जावे लागते. समाजातील लोकांचे महिला विषयीचे  विचार जोपर्यंत बदलत नाहित. तोपर्यंत महिलांना अन्याय सहन करावा लागणार.यावर कोठोर कायदे करण्याबरोबर सर्वांनी एकञ येवुन लढा पुकारणे गरजेच आहे.महिलांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतः आत्मनिर्भर ,कणखर बनले पाहिजे, आपला समाजाला अभिमान वाटावा अस काही कार्य  केले पाहिजे केवळ ८ मार्चच नव्हे तर संपूर्ण जीवनभर  स्त्रियांच्या अस्मितासाठी समाजात प्रबोधन व्हायला हवे.प्रत्येक घराघरातील स्त्रीला तीचे अस्तित्वासाठी संघर्षा ऐवजी जर सन्मान मिळाला तरच महिला दिन आदरयुक्त ठरेल.सर्व महिलांना आज महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

– सौ.सुप्रिया शेखर अवघडे वावरहिरे


Back to top button
Don`t copy text!