
दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । शहर -परिसरातील डोंगररांगात अज्ञातांकडून आगी लावण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. यामुळे डोंगररांगा काळवंडल्या असून, हे प्रकार रोखण्यासाठी स्थानिकांनी आगी लावणार्यांची माहिती वन विभागास देणे आवश्यक आहे.
शहरालगतच्या अजिंक्यतारा किल्ला, महादरे, पेढ्याचा भैरोबापरिसरात मोठ्या प्रमाणात संरक्षित आणि संवर्धित वने आहेत. या वनांमुळे येथील वनसंपदा आणि प्राणीसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. ही वने काही दिवसांपासून आगीच्या ज्वालांमुळे भडकत आहेत. वाळलेले गवत, पडलेला पालापाचोळा व इतर कारणांमुळे आगीत येथील मोठी वनसंपदा जळून खाक होत आहे.
आठवड्यापूर्वी अजिंक्यतारा परिसरात तर मागील गुरुवारी महादरे गावाच्या वरील भागातही आग लागली. वनसंपदा जळून खाक झाली. शहरालगतच्या डोंगररांगांत वनविभागानजीक अनेकांची खासगी जागा असून, त्यात अशा आगी जाणीवपूर्वक लावल्या जात असल्याचे डोंगररांगालगतची गावे आणि वसाहतीमधील नागरिकांचे म्हणणे आहे.