
दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । शेतकर्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव व दिव्यांगांना सहा हजारांची पेन्शन आदी मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 13) प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातार्यातील निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन होईल. त्यापूर्वी दुपारी येथे मेळावा होणार असल्याची माहितीप्रहारचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा चव्हाण, पाटणचे तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी, अक्काताई ढेबे, माधुरी बावधने उपस्थित होते.
मनोज माळी म्हणाले, प्रहार संघटनेचा मंगळवारी दुपारी दोन वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. माजी मंत्री कडू यांच्या उपस्थितीत होणार्या मेळाव्यास सातारा, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. मेळाव्यात संघटनेतील कार्यकर्त्यांना संताजी-धनाजी पुरस्काराने सन्मानितकरण्यात येणार आहे.
ते म्हणाले, सरकारनेजाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे शेतकर्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागण्यांसाठी माजी मंत्री कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहारच्या वतीने रक्तदान आंदोलन करण्यात येईल. रायगडपासून आंदोलनास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढला होता, तरीही सरकारला जाग आली नाही. त्यामुळे 14 मे रोजी राज्यातील सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे.
माजी मंत्री कडू हे सातारा दौर्यावर असल्याने 13 मे रोजी दुपारी येथील मेळावा झाल्यावर सायंकाळी सातच्या सुमारास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे.