कोळकीतील बहिण भावंडांनी सलग चारशे जोर मारुन अनोख्या पध्दतीने महिला दिन केला साजरा


स्थैर्य, कोळकी, दि. ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी ता. फलटण येथील बहिण भावंडांनी सलग चारशे जोर मारुन अनोख्या पध्दतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहिण भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.

फलटण शहराचे उपनगर व तालुक्यातील महसूल व राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण अशी कोळकी गावची ओळख आहे. कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रेश्मा देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख यांची पुतणी तनिष्का गजानन देशमुख वय १४, समिक्षा गजानन देशमुख वय ९ व मुलगा हर्षद संजय देशमुख वय १२ हे या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून सुरु झालेल्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या देशमुख बहिण भावानी सलग चारशे जोर मारले. ते दररोज नियमीतपणे पहाटे पाच वाजता उठून योग, सपाट्या, जोर असा व्यायाम करतात. त्यासाठी त्यांना पै. संजय देशमुख यांचे व गजानन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभते. या बहिण भावंडाचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा व कौतुकाचा ठरला आहे. इंटरनेटच्या जाळात अडकलेल्या मुलांसाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी अशा प्रतिक्रिया कार्यक्रस्थळी व्यक्त झाल्या.

या उपक्रमानंतर माजी सरपंच व जेष्ठ नेते दत्तात्रय शिंदे, सरपंच विजया नाळे यांनी मुलांचा सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा देशमुख, रुपाली चव्हाण, सपना कोरडे, वर्षा शिंदे, प्राजक्ता काकडे आदींसह ग्रामपंचायत सदस्या, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!