
थेट WhatsApp वर मिळवा
आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स कंपनीला विकण्याच्या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रस्तावाचा निषेध करण्यासाठी येत्या ३ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा , दि. १७ नोव्हेंबर : आयडीबीआय बँकेची मालकी परदेशी कंपनीकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉयीज’ या संयुक्त संघटनेने बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संपाची अधिकृत नोटीस पाठवली आहे. या बंदमुळे ३ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व शाखा आणि प्रशासकीय कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार आहे.
राष्ट्रीय मालमत्तेच्या रक्षणासाठी बेमुदत संपाचा इशारा
बँक विक्रीचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) तात्काळ रद्द करावा, अशी मुख्य मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. आयडीबीआय बँक ही देशाची राष्ट्रीय मालमत्ता असून तिचे परदेशी कंपनीला खासगीकरण करणे अयोग्य असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात कोणतीही पूर्वसूचना न देता बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
५३ हजार कोटींच्या व्यवहारावर विरोधकांचेही प्रश्नचिन्ह
सध्या या बँकेत केंद्र सरकारचा ४५.४८ टक्के आणि एलआयसीचा ४९.२४ टक्के हिस्सा आहे. यातील एकूण ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडातील फेअरफॅक्स कंपनीला सुमारे ५३ हजार कोटी रुपयांना विकण्यास १४ ऑक्टोबर रोजी मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही या निर्गुंतवणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले असून, या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.





