
थेट WhatsApp वर मिळवा
शेतीतील कष्ट कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असून, संशोधक, कृषी स्टार्टअप्स आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय निर्माण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रीनओव्हेशन ॲग्री मेकॅनायझेशन चॅलेंज’ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील प्रयोगांना आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’च्या माध्यमातून सरकारने नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ‘बाएफ’चे अध्यक्ष डॉ. भारत काकडे, समूह उपाध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, एकता जाजू आणि समृती भगत आदी उपस्थित होते.
केवळ मोठी यंत्रे म्हणजे आधुनिक शेती नव्हे
यावेळी फडणवीस म्हणाले की, केवळ मोठमोठ्या यंत्रांचा वापर करणे म्हणजे शेती आधुनिक होत नाही, तर यांत्रिकीकरणात लहान शेतकऱ्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवळ शेतीमाल विक्रीपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूल्यसंवर्धन आणि नव्या बाजारपेठांचा लाभ घ्यावा. तसेच स्टार्टअप्सनी विकसित केलेले नवे तंत्रज्ञान थेट बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण उद्योजकतेला ‘बाएफ केअर्स’चे पाठबळ
लहान होत जाणारे जमीनधारणेचे क्षेत्र आणि हवामान बदलाला तोंड देणारी शेती ही प्रमुख आव्हाने असल्याचे सांगत २०३० पर्यंत एक कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे भारत काकडे यांनी नमूद केले. या उपक्रमात देशभरातून निवड झालेले ३० कृषी स्टार्टअप्स आणि २० शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रत्यक्ष शेतावर चाचणी आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.





