स्थैर्य, सातारा, दि.२२ : मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया येत्या एक तारखेपासून सुरू होत आहे. यामध्ये जिल्हा बॅंक, प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक, रयत सेवक बॅंक, सैनिक सहकारी बॅंक, तसेच कृष्णा कारखाना या मोठ्या संस्थांचा समावेश असून, पहिल्या टप्प्यात मतदार याद्या व ठरावांची प्रक्रिया होणार आहे; पण सर्वांची उत्सुकता लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे यापूर्वी झालेले ठराव कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालकांसह नव्याने संचालक म्हणून येण्यासाठी तयारी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसोबतच आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही होत आहेत; पण त्यासाठी सुरवातीला मतदार याद्या तयार करून त्यावर हरकती, सुनावणी होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. जिल्ह्यातील 1348 सहकारी संस्थांच्या निवडणुका आगामी तीन ते चार महिन्यांत होतील. कोरोनामुळे तीन टप्प्यांत सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ मिळाली होती. 31 डिसेंबरला ही मुदतवाढ संपत असून, एक जानेवारीपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सेवक बॅंक, सैनिक सहकारी बॅंक, प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक, बाजार समिती, मोठ्या पतसंस्था व विकास सेवा सोसायट्यांचा समावेश आहे.
सहकाराच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरणार आहे ती जिल्हा बॅंक, कृष्णा कारखाना आणि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेची निवडणूक. जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया कोरोनाच्या आधी सुरू झाली होती. 31 मार्च रोजी ठराव जमा करायचे होते, तोपर्यंत कोरोनाचे लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना सुरवातीला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे ठराव, तसेच राहिले आहेत. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ मिळाल्याने, त्या वेळी झालेले ठराव आता पुढे तसेच वापरायचे, की नव्याने करावयाचे याविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविले जात होते; पण उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारीमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये मागे झालेले ठराव पुढे वापरले जावेत, असे ठरलेले आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या संचालकांना नव्याने ठराव करण्याची डोकीदुखी करावी लागणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे; पण ऐन वेळी कोणी या प्रक्रियेला विरोध केला आणि न्यायालयात गेले तर मात्र, पुन्हा नव्याने ठरावाची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू होईल. आहे हेच ठराव वापरले तर मात्र, तातडीने मतदार याद्या तयार करून त्यावरील हरकती व सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर म्हणजे जानेवारीतच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकणार आहे. सध्यातरी आहे हेच ठराव कायम ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा बॅंकेचे 21 संचालक…
जिल्हा बॅंकेचे 21 संचालक असून, 11 संचालक हे सोसायटी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, तर उर्वरितमध्ये खरेदी- विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था, नागरी बॅंका आणि पतसंस्था, गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था, औद्योगिक, विणकर, मजूर, ग्राहक, पाणीपुरवठा संस्था यातून प्रत्येकी एक, तर राखीवमधून अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग, महिला प्रतिनिधी दोन यांचा समावेश आहे. सोसायटी मतदारसंघाचे ठराव तयार आहेत.