खुल्या प्रवर्गातील राखीव जागांवर अन्य उमेदवार लादू नका; मराठा क्रांती मोर्चाचा प्रशासनाला इशारा


 


स्थैर्य, कुडाळ, दि.२२: सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा, जावली व खुल्या प्रवर्गातील सर्व समाज त्यांच्यासाठी असलेल्या खुल्या जागेवर हक्क सांगण्यासाठी एकवटले आहेत. कुडाळमध्ये सर्व पक्षांच्या पॅनल प्रमुखांना निवेदन देऊन खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर अन्य उमेदवार लादू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जावली तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत व इतर निवडणुकांचा माहोल सुरू आहे. राजकीय नेते मंडळी ब-याच वेळी खुल्या प्रवर्गातील जागेवर अन्य उमेदवार देतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांवर अन्याय होतो. त्यामुळे यापुढे असा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या इच्छुकांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे. यापुढे मराठा समाजाच्या वतीने शासनाला हेही निर्देशित केले जाणार आहे की, इथून पुढच्या सर्व निवडणुकीसाठी जर खुला प्रवर्ग इतर जागी उभा राहू शकत नसेल अथवा उमेदवारी नामनिर्देशन फॉर्म भरू शकत नसेल, तर ज्या खुल्या जागा आहेत त्याच्यावर इतर समाजानेही आपला हक्क सांगू नये. त्या जागा खुल्या समाजामधूनच निवडल्या जाव्यात. त्याची सुरुवात कुडाळ (ता. जावळी) येथील सकल मराठा समाजाने केली. गावोगावी असलेल्या सर्व केंद्रप्रमुख, समन्वयक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या पद्धतीचे निवेदन दिले जाणार आहे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

मराठा क्रांती मोर्चासह खुल्या प्रवर्गातील कार्यकर्त्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या जागी अन्य उमेदवार न देण्याबाबत व्यक्त केलेल्या भावना नक्कीच योग्य आहेत. परंतु हा निर्णय सर्व पॅनल प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये ठराविक समाजाचे प्राबल्य असते. अशावेळी सर्व पॅनलनी हे बंधन पाळणे आवश्यक आहे. एखाद्या पॅनलने जर त्या वॉर्डमधील जातीवर आधारित मतांचा विचार करुन उमेदवार दिला, तर अडचण येऊ शकते. असे मत जावली सौरभ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!