
स्थैर्य, फलटण : महाराष्ट्रात १९ जिल्ह्यातील १४२२४ ग्रामपंचायती मुदती संपल्याने आगामी काळात बरखास्त करुन तेथे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकांची नियुक्ती करणार आहेत. त्याबाबत शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाची एकजुट कायम ठेवून करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता, नियम/निकषांच्या अंमलबजावणी बाबत गाव पातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यमान सरपंचांनी घेतलेली समन्वयाची भूमिका लोकांना एकत्र ठेवून करोना नियंत्रणासाठी उपयुक्त ठरल्याचे अनेक गावांत दिसून आले आहे. शासन नव्या नियमानुसार वर उल्लेख केलेल्या बाबी सुरळीत ठेवून गावाचा सर्वांगीण विकास साधणारा, गावात सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सक्षम सरपंच निवडला जावा यासाठी सरपंच निवडीची प्रक्रिया लोकांतून सरपंच निवडण्याच्या योजनेतून एकीकडे स्विकारत असताना तीच जबाबदारी ज्यांच्यावर सोपविली जाणार आहे ती व्यक्ती नियुक्त करताना या पद्धतीचा विचार करीत नाही ही बाब खटकणारी आहे. त्यासाठी शासनाने प्रशासक नियुक्तीची ही प्रक्रिया ग्रामसभेवर सोपवून संपूर्ण गावाने शिफारस केलेल्या व्यक्तीस ग्रामपंचायत प्रशासक पदावर नियुक्त करावे किंवा ग्रामसभेने गावातील ३/४ व्यक्तींची या पदासाठी शिफारस करावी त्यातून पालक मंत्री यांच्या संमतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकाची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी काही जाणकार आणि ग्रामीण भागातील काही आजी/माजी सरपंचांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बरखास्त झाल्यावर त्यांच्या जागी नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशासक यांना गाव पातळीवरील या करोना समितीचे अध्यक्षपद प्राप्त होणार असून त्यांना ही सद्यस्थितीत महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, त्याचबरोबर गाव पातळीवर असलेले विकास कामांचे विषय, शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना प्राप्त करुन देण्यासाठी, गावातील शेती, छोटे व्यवसाय, कायदा सुव्यवस्था परिस्थिती या सर्व बाबी जबाबदारीने हाताळून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याची जबाबदारी आगामी काळात या प्रशासकावर येणार आहे.