स्थैर्य, कोळकी, दि. १३ : कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्या राजे गटाने जे अधिकृत उमेदवार उभे केले आहेत त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहावे. बंडखोर उमेदवार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. तरी बंडखोरांना अजिबात थारा न देता अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे रहावे. कोळकीचा विस्तार झपाट्याने होत असल्याने आगामी काळामध्ये कोळकीचा विकास अविरत सुरु ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, राधिका पखाले व तेजश्री मुळीक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केलेले आहे.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, राधिका पखाले व तेजश्री मुळीक यांच्या हाऊस टु हाऊस प्रचारार्थ रॅली दरम्यान श्रीमंत सत्यजितराजे व श्रीमंत विश्वजितराजे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.