मनोरुग्णाने खाल्ला कोरोनाबाधित मृतदेहाचा भाग?; व्हायरल व्हिडीओमुळे फलटणमध्ये खळबळ


स्थैर्य, फलटण दि.28 : कोळकी, ता.फलटण येथील कोरोनाबाधितांच्या स्मशानभूमीमध्ये बसून एक मनोरुग्ण मृतदेहाचा काही भाग खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे फलटण शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर प्रशासनाच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, ‘‘या ठिकाणच्या मृतदेहांचे संपूर्ण दहन झाले आहे. अन्यविधीसाठी ठेवण्यात आलेले पदार्थ सदर मनोरुग्ण खात असावा’’, असा संशय नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सदर मनोरुग्णास सायंकाळी शहरातील जिंती नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फलटण शहर व परिसरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांवर कोळकी (ता.फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत फलटण नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात. आज दि.28 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणच्या एका चितेजवळ बसून एक मनोरुग्ण चितेतून काही तरी काढून त्याचे तुकडे करुन खात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची खबर नगर पालिका प्रशासनाला देण्यात आली. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी आल्यानंतर माणसांची चाहूल लागताच सदर मनोरुग्ण इसम तिथून निघून गेला. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून सदर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. पालिका व पोलीस प्रशासनाने त्या मनोरुग्णाचा शोध घेवून सायंकाळी जिंती नाका परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

सदर प्रकाराबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, पालिकेच्यावतीने मृतांचे संपूर्ण दहन केले जाते. या ठिकाणी कोणताही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नव्हता. अनेकदा मनाई करुनही नातलगांकडून मृत्यू नंतरचे विधी केले जातात. त्यावेळी ठेवलेले पदार्थ सदरचा इसम खात असल्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही’’, असे विनोद जाधव यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!