वाळूच्या दंडापोटी जमीन होणार सरकारजमा; कऱ्हाड तहसील कार्यालयाची धडक कारवाई


 


स्थैर्य, कऱ्हाड, दि.१३: अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या
वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18
जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो न
भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न
भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू
करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित हवालदिल झाले आहेत. 

कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या
प्रमाणात वाळू उपसा केला जातो. तो करताना अनेकदा अवैधरीत्या करण्यात येत
असल्याचेही यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायातून स्पष्ट झाले आहे. अशा
अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक
करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता. अनेकांनी तो दंड भरलाच नाही.
त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली
आहे. त्यांच्या सातबारावर संबंधित दंडाचा बोजा चढवल्यानंतरही त्यांनी
दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना आता ती जमीन सरकारजमा करण्याची नोटीस
पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्‍यातील पोतले,
ओंड, ओंडोशी, कार्वे, शिरवडे येथील नऊ, मालखेड, नडशी येथील तीन, तर वारुंजी
येथील एक अशा 18 जणांना 3 कोटी 13 लाख 68 हजार 912 रुपयांच्या वसुलीच्या
नोटीस पाठवल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मुदतीत त्याची कार्यवाही न केल्यास
संबंधितांच्या सातबारावरील बोजा कायम ठेऊन त्या जमिनी सरकारजमा करण्यात
येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील 18 जणांना वाळूच्या
दंडापोटी भरायच्या रकमेच्या नोटिसा पाठवल्या आहेत. संबंधितांनी मुदतीत
कार्यवाही न केल्यास त्यांची जमीन सरकार जमा होणार आहे. संबंधितांनी त्याची
नोंद घेऊन मुदतीत दंड भरावा. 

-अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!