
दैनिक स्थैर्य । 10 मे 2025। सातारा । सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रखडलेल्या निवडणुकांना हिरवा कंदील दिल्यानंतर गतकाही वर्षांमध्ये थंडावलेले भावी नगरसेवकांनी आता पुन्हा जोर बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक जण आपल्या जुन्या नव्या प्रभागांमध्ये फिरू लागले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये ज्या ना त्या कारणाने आवर्जून भावी नगरसेवक जात आहेत. परंतु आगामी होणारी फलटण नगर परिषदेची निवडणूक जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार की त्यानंतर झालेल्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार की आता नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार या प्रश्नांची उत्तरे मात्र काळाच्या पोटामध्ये दडलेली आहेत.
फलटण नगर परिषदेची सन 2016 साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 25 नगरसेवक निवडून गेलेले होते व लोकनियुक्त नगराध्यक्षांची निवड झालेली होती आत्ता होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही लोकनियुक्तच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय पडते त्यावर उमेदवार तयारी करणार की फलटणला यंदा हाय वोल्टेज निवडणूक बघायला मिळणार का असा प्रश्न सुद्धा फलटणकर यांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे.
इच्छुक भावी नगरसेवकांनी आपापल्या नेते मंडळींकडे आता जाण्याचे प्रमाण वाढवले असून नेता फलटणला आहे की नाही हे बघून सकाळी सकाळीच नेत्याच्या बंगल्यावर हजेरी लावण्याचे काम भावी नगरसेवक करू लागले आहेत नेत्यांच्या बंगल्यावर हजेरी लागल्यानंतर पुन्हा आपल्या प्रभागात भावी नगरसेवक हे ऍक्टिव्ह होत असताना दिसत आहेत
आपल्या प्रभागांमधील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेमध्ये सुद्धा भावी नगरसेवकांचे हेलपाटे आता वाढलेले आहेत. भावी नगरसेवक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांपासून चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत संपर्क ठेवत असून प्रभागातील कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न आता जोरदार रित्या करीत आहेत.