क्रीडासंस्कृतीचा आदर्श


स्थैर्य, सातारा, दि. 19 : सातार्‍यात समोर दिसल्यावर ज्यांच्या पायावर हात ठेवून अभिवादन करावे अशी माणसे आता दुर्मिळ होत चालली आहेत. कधी काळी वेगवेगळ्या क्षेत्रात निव्वळ समाजसेवेच्या भावनेने काम करत  आपले जगणे आपला पोटापाण्याचा आणि चरितार्थाचा उद्योग संभाळत झोकून देणार्‍यांची मांदियाळी या शहरात आणि परिसरात होती. कर्मवीर भाउराव पाटील, किंवा बॅ पी जी पाटील,  डॉ मो ना आगाशे, हे आणि असे महापुरूष आपापल्या क्षेत्रात आपले समाजसेवेचे इप्सित साध्य करण्यासाठी तनमनधनपूर्वक स्वत:ला झोकून देत होते. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत, आणि शिक्षणापासून ते कलाक्रीडा क्षेत्रापर्यंत या क्षेत्राचे भले व्हावे म्हणून राबणार्‍या मंडळींची मांदियाळी या शहरात होती. चौकाचौकात होर्डिंग लावून आपण कसे महापुरूष आहोत आणि समाजाने आपल्या भल्याबुर्‍या कामगिरीकडे पहात कदाचित भीतीने कदाचित नाईलाजाने मान खाली घालून उभे रहावे आणि आपले मोठेपण सिद्ध करत आहोत असे मानणार्‍यांची गर्दी सध्या पेठापेठातून झाली असली तरी ज्यांच्यापुढे मनापासून नतमस्तक व्हावे आणि ज्यांचे पाय वंदन करण्यासाठी धरावे अशा महापुरूषांची मात्र या शहरातच नाही तर जवळपास सगळीकडेच दुष्काळ पडला आहे. हवामानामुळे येणारा दुष्काळ कधी तरी निसर्ग प्रसन्न होऊन दूर करून टाकतो मात्र माणूसकीचा आणि जनसेवेसाठी खर्‍या अर्थाने राबणार्‍यांचा दुष्काळ नष्ट करणे मात्र नष्ट होईल असे वाटत नाही. त्यामुळे समाजसेवेची अशी दुर्मिळ होत चाललेली हिरवळ कोठे दिसली की मन भरून मेते. अशा मोजक्या व्मक्तिमत्वात सातार्‍यातील शिवाजी उदय मंडळाचे कर्ते करविते बबनराव उथळे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल.

कधी काळी सातार्‍यात जवळपास पेठेगणिक खेळाची मैदाने होती. शुक्रवारातले प्रारंभीचे आर्य क्रिडोद्धारक मंडळ, नंतरची गजानन व्यायाम शाळा आणि सध्याचे क्रांतीस्मृती, भिडे गुरूजी व्यायाम शाळा, कृष्ण क्रीडा मंडळ, भारत माता मंडळ आणि शिवाजी उदय मंडळ, ही देशी क्रीडांची जपणूक करण्यासाठी ध्येय्यवाद म्हणून चालवणार्‍यांची मांदियाळी सातार्‍यात होती. गणपतराव साठे, विट्ठलराव सोमण, भारतमाताचे पावशे, कृष्ण क्रीडा मंडळाचे शंकरराव गोसावी आणि कर्नल भोसले, ही आणि अशी मंडळी देशी खेळ ही बालवयापासून सवय म्हणून अंगिकारली  जावी  म्हणून कोणतेही मोह न बाळगता झटत होती. यात नावे घेतलेली जवळपास सर्व मंडळेे आता नावापुरतीच उरली किंवा इतिहासजमा झाली. गणपतराव साठ्यांपासून शिंगरे मामा,पावशे आसनीकर, भोसले, गोसावी हे आणि असे अनेक काळाच्या पडद्याआड निघून गेले. चौकाचौकातून जिमखाना नावाचा व्यायामाच्या नावाखाली पैसा कमावणार्‍यांची दुकाने जोरात चालू लागली. आपल्या पोराना तेंडुलकर धोनी बनवण्याची घाई झालेले पालक पोरांच्या पाठीला क्रिकेटची बॅट टांगून क्रिकेट शिकवणार्‍या दुकानातून आपल्या पोराना पाठवू लागली, हे सर्वसाधारण चित्र असले तरी अनंत इिंंग्लश स्कूलच्या अलिकड असलेले शिवाजी उदय मंडळ हे मात्र कालच्या आठवणी ताज्या करत सुखावणारे एक ठिकाण आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त बबनराव उथळेे या ऋषितुल्य व्मक्तिमत्वामुळेच पहायला मिळते आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही.

चरितार्थासाठी बबनरावांनी आयुष्मभर एल आय सीत नोकरी केली असली तरी त्यांची प्रत्येक संध्याकाळ मात्र फक्त आणि फक्त शिवाजी उदय मंडळातच देशी खेळांच्या विकासासाठीच वापरली गेली.  हे कायमचे स्मरणात राहणारे आणि सुखावणारे चित्र आहे.  आजही संध्याकाळी तिथून जाताना मैदानावर खुर्ची टाकून मुलांच्या खेळांचे निरीक्षण करणारे आणि त्याना योग्य सल्ला देणारे बबनराव पाहिले की मन आपोआप नतमस्तक होते. आणि मग मंडळात जाऊन बबनरावांच्या पाया पडून आले की आत्मिक समाधान लाभते बबनरावांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या पिढ्यामागून पिढ्या तयार झाल्या. नावेच घ्यायची झाली तर डॉ दाभोळकर, डॉ लवंगारे, डॉ मेहेंदळे, चंदू चव्हाण, संपत आणि भय्या तारळेकर, शिवलिंग साखरे, वजीर आणि त्याचा भाऊ, वसंता पावसकर, विजय जाधव, नंदू नाडगौंडी ही आणि अशी अनेक नावे समोर येतात.

डॉ दाभोळकर अनिसच्या माध्ममातून नामंकित होण्याआधी लोकप्रिय होते पट्टीचे कबड्डीपटू म्हणून. आणि याचे सारे श्रेय्य फक्त आणि फक्त बबनरावानांचा आहे हे अधोरेखित सत्य आहे. काही काळ बबनराव राजकारणातही वावरले पण हे आपले काम नाही येथे समाजसेवकाना नाही तर समाजहित भक्षकाना स्थान आहे याची जाणीव होउन ते त्या क्षेत्रातून बाजूला झाले. एका निवडणूकीत मी त्यांच्या विरोधी प्रचारही केला. पण प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला अभिवादन करूनच मी भाषणाची सूरवात केली. अशी माणसे आता दुर्मिळ होत चालली आहेत. खेळ हा आवड आणि छंद राहण्याऐवजी आता धंदा बनला आहे. त्यात कमाई करणारी यांच्या आयुष्यात कधी यांचा खेळाशी संबंध तरी आला का असा संभ्रम निर्माण करणारी पाप्याची पितरे क्रीडा संस्थातून आपले खिसे भरत आहेत. खेळावरील निर्मम निष्टेने पिढ्यांमागून पिढ्या घडवणारे बबनराव हे महापुरूषांच्या यादीतच असतात. अशा महापुरूषांना वंदन करावे आणि त्याना दिर्घायुष्याची मागणी विधात्याकडे करताना या निमित्ताने आपली देशी खेळांची क्रीडा संस्कृती जपावी आणि वर्धिष्णु व्हावी अशी काहीशी स्वार्थी मानसिकता जपावी. आणि बबनरावाना त्यानी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ अभिवादन करताना त्याच्या वाढदिवशी नतमस्तक व्हावे हा उपचार नाही तर मानसिकता आहे हेच खरे.

संजय कोल्हटकर , सातारा 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!