पालकमंत्र्यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । पुणे । पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल, प्रकल्पाशी संबंधित विकासक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकंमत्री श्री. पाटील म्हणाले, दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र १९ लाभार्थ्यांना येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी. श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी. गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची ५६ मीटरपर्यंत वाढविण्याबाबत आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला दिल्या.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी योजनांबाबत माहिती दिली.

पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना, श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, कसबा पेठ, आणि ७२१ गुजरात कॉलनी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!