स्थैर्य, फलटण, दि. १६ : सध्या संपूर्ण राज्यामध्ये कोरोना या आजाराने धुमाकुळ घातलेला आहे. मार्चमध्ये सुरू झालेला कोरोना आजार कसा रौद्ररूप धारण करतो हे कोणालाही माहीत नव्हते. अशा मध्ये दिवाळी अंकाची परंपरा कायम ठेवणे हे जिकरीचे होते. दैनिक स्थैर्यने आपल्या दिवाळी अंकाची परंपरा कायम ठेवत कोरोनाची संपूर्ण माहिती असलेला दिवाळी अंक प्रकाशित करून वाचकांना दीपावलीनिमित्त एक मेजवानीच दिलेली आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
स्थैर्यच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, सचिन तिवाटणे, फलटण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संजय देशमुख, जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे, दत्तात्रय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, दैनिक स्थैर्य दरवर्षी विविध विषयाला अनुसरून दिवाळी अंक प्रकाशित करीत असतो. या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये कोरोना विषयी परिपुर्ण माहिती असून दैनिक स्थैर्यचा दिवाळी अंक वाचकांनी जरूर वाचावा व या दिवाळीमध्ये कोरोना विषयी संपूर्ण माहिती करून घ्यावी व घाबरून न जाता शासनाने दिलेल्या निकशांचे काटेकोर पालन करून कोरोनाला हद्दपार करणे गरजेचे आहे.
यावेळी नगरसेवक पांडूरंग गुंजवटे म्हणाले की, फलटणला साजेसा दैनिक स्थैर्यने दिवाळी अंक प्रकाशित केलेला आहे. फलटणकर नेहमीच दैनिक स्थैर्यच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून आगामी काळातही ते उभे राहतील. दैनिक स्थैर्यने अशीच प्रगती करत राहावी व आगामी काळात फलटणकरांना वाचण्यासाठी विविध वेगवेगळ्या विषयांवर लिखाण व मान्यवरांचे लेख वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, असेही स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे म्हणाले की, फलटणकर वाचकांसाठी दैनिक स्थैर्यने आणलेल्या दिवाळी अंकांमध्ये कोरोना विषयीची संपूर्ण माहिती असून फलटणकरांनी नक्की दैनिक स्थैर्यचा दिवाळी अंक वाचावा व दैनिक स्थैर्यने सुरू केलेल्या www.sthairya.com ला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.