दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणा-या खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या आज मंगळवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीकरिता शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून २६ मतदान केंद्रासाठी २६ टेबलद्वारे मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
म्हावशी ता.खंडाळा येथील खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखाना लि.ची सन २०२०-२१ ते २०२५-२६ च्या २१ जागेकरिता पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या २१ जागेकरिता अपक्षासहित ४३ उमेदवार रिंगणात असून तब्बल ९ हजार मतदार मतदानारांपैकी ७ हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी ७९.७१ टक्के मतदान झाल्यानंतर मतमोजणीकडे खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार यावर पैजा रंगू लागल्या आहे. विशेषतःबाळसिध्दनाथ संस्थापक सहकार पॅनल व खंडाळा तालुका शेतकरी विकास परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारफेरीमध्ये खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये मुख्यतः वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे विद्यमान आमदार मकरंद पाटील व किसनवीर सह.साखर कारखानीचे चेअरमन माजी आमदार मदन भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्याकरिता ,खंडाळा शिरवळ,लोणंद येथील अधिकाऱ्यांसहित सातारा येथील दंगा नियंत्रण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.