फलटण बसस्थानकाची अवस्था दयनीय; खड्डे आणि अस्वच्छता यामुळे प्रवाशांच्यात नाराजी


दैनिक स्थैर्य । दि. 19 ऑक्टोबर 2021 । फलटण । मोठमोठाले खड्डे, ठिकठिकाणी अस्वच्छता, सतत फिरणारी मोकाट जनावरे अशा भिषण परिस्थितीमुळे फलटण एस.टी.बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या गैरसोयीमुळे प्रवाशांमधून फलटण आगाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

फलटण बसस्थानक नेहमीच समस्यांच्या गर्तेत वेढलेले असते. बसस्थानकातील सततची दुरावस्था पाहून याला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बस स्थानक उत्कृष्ट दर्जाचे व्हावे व त्यादृष्टीने कामकाज जलद गतीने करण्यात व्हावे यासाठी सातारा येथील काही अधिकार्‍यांसोबत बैठक लावून अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यानंतर त्या सूचना पायदळी तुडविण्यात आल्याचे चित्र फलटण बसस्थानकाची आजची दुरावस्था पाहून स्पष्ट होते.

गत काही वर्षांपूर्वी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बस स्थानकाच्या कामाबाबत आढावा बैठक घेऊन सातारा, फलटण व मुंबई येथील परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश दिले होते. परंतु त्यांच्याही निर्देशांकडे बस स्थानक अधिकार्‍यांनी व त्यांच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी कानाडोळा केला असल्याचे बोलले जात आहे.

फलटण बसस्थानकात नुतनीकरणाच्या अनुषंगाने काही कामे करण्यात आली असली तरी अद्याप अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसारखी अनेक महत्त्वाची कामे प्रलंबीत आहेत. बसस्थानक बाहेरुन नेटके दिसत असले तरी आतल्या दुरुस्तीचे काय? असा सवाल प्रवाशांना सतावत आहे.

बारामतीशी तुलना

फलटणपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या बारामती शहरातील विकासकामांसोबत फलटणची तुलना नेहमीच होत असते. या तुलनेत फलटण बसस्थानक सुटावे तर नवलच. बारामतीत सुसज्ज एस.टी. बसस्थानकाचे काम सध्या सुरु आहे. बारामतीचे हे बस स्थानक उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः किमान चार ते पाच वेळा भेट देऊन तेथील अधिकार्‍यांना योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे व दर्जेदार बसस्थानकासाठी ते स्वत: आग्रही आहेत. तिथे जर हे घडू शकते तर आपल्या इथे कां नाही ? असा सवाल नागरिक उपस्थित करुन फलटणच्या बसस्थानकाची दुरावस्था दूर करण्यासाठी आपल्याही लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!