‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’; तहसील कार्यालयातील संगणक चोरीचा फटका सर्वसामान्यांना बसणार?


स्थैर्य, फलटण दि.31 : शासकीय कार्यालयातील कासवगतीने चालणारा कारभार सर्वश्रूत आहेत. त्यात जर का कार्यालयीन कामकाजाच्या महत्त्वाच्या गोष्टीच जर कार्यालयातून गायब झाल्या तर कर्मचार्‍यांना ‘टोलवाटोलवीला’ आयते कोलीतच मिळते. असाच काही प्रकार फलटणच्या तहसिल कार्यालयातील महसूल विभागात दिसू लागला तर अजिबात नवल वाटून देऊ नका. कारण; या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, किबोर्ड, माऊस, केबल, इंटरनेटचे राऊटर अशी दैनंदिन कामकाजातील महत्त्वाची सामुग्री लंपास केली आहे. त्यामुळे ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण येथील तहसीलदार कार्यालय फलटण येथील महसूल शाखेतून अज्ञात चोरट्याने कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबल ,राउटर असा सुमारे 2 लाख 700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तहसीलदार रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार दि 29 जानेवारी रात्री 10.15 ते शनिवार दि.30 जानेवारी सकाळी 10.30 वा चे दरम्यान तहसीलदार कार्यालय फलटण येथील महसूल शाखेतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरता मुद्दाम लबाडीने व्हरांड्याच्या नोटीस बोर्ड वर ठेवलेली महसूल शाखेची चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश करून

पुढील मुद्देमाल चोरून नेहला आहे.
१) २५,०००/- किमतीचा DELL कंपनीचा PC ,UPS माऊस
२) ३५,०००/- किमतीचा DELL कंपनीचा PC ,UPS माऊस
३) २०,०००/- किमतीचा HP कंपनीचा काळे रंगाचा CPU मॉनिटर, केबल
४) २५,०००/- किमतीचा DELL कंपनीचा PC ,UPS माऊस , कीबोर्ड , टोनर
५) १८,०००/- किमतीचा ACER कंपनीचा मॉनिटर ,एचपी कंपनीचा प्रिंटर
६) २२,०००/- किमतीचा DELL कंपनीचा मॉनिटर, CPU त्याची केबल माऊस
७) २४५००/- किमतीचा DELL कंपनीचा मॉनिटर, CPU त्याची केबल माऊस एचपी कंपनीचा प्रिंटर
८) १५,०००/- लेनोवो कंपनीचा काळे रंगाचा लॅपटॉप व चार्जर केबल
९) १३,०००/- किमतीचा DELL कंपनीचा मॉनिटर, असेंबल CPU, कीबोर्ड, माऊस
१०) २२००/- किमतीचा एक D LINK व राउटर BSNL कंपनीचा
११) १०००/- किमतीचा एक D LINK १६ स्विच
असा एकूण २ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम -45/2021 भा. द. वि. कलम 457, 380 नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

दरम्यान, महसूल विभागाच्या गाव कामगार तलाठ्यांकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक विशेषत: शेतकरी वर्ग या ना त्या कामाने रोज तहसिल कार्यालयात खेटा घालत असतो. सातबारा, खातेउतारा ही जमिनीच्या संबंधीत महत्त्वाची मानली जाणारी कागदपत्रे देण्याची सुविधा ऑनलाईन झाल्याने संगणकाच्या सहाय्यानेच या गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जातात. मात्र आता कार्यालयातील हे संगणकच चोरट्यांनी चोरुन नेल्यामुळे पुढचे काही दिवस यंत्रणा पूर्ववत सुरु होईपर्यंत कार्यालयाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्यांना बसणार कां? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!