शोपियांमध्ये रात्रभर सुरू होती चकमक, लष्करच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, बडगाममध्ये एक SPO शहीद


स्थैर्य, जम्मू, दि.१९:  जम्मू-कश्मीरच्या शोपियांमध्ये गुरुवारी रात्री सुरक्षादलाने काही दहशतवाद्यांना घेरले. सकाळपर्यंत सुरू असलेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दुसरीकडे बडगाममध्ये एन्काउंटर दरम्यान एक SPO शहीद झाले आहेत. येथे शुक्रवारी सकाळी जवळपास 6 वाजता सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

काश्मीरचे IG विजय कुमार म्हणाले की शोपियांमध्ये ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता. दोन्ही चकमकींबद्दल माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की शोपियानमधील चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याच वेळी SPO मोहम्मद अल्ताफ बडगाममधील दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झाले आहेत. या कारवाईत सिलेक्शन ग्रेडचे हवालदार मंजूर अहमद जखमी झाले आहेत.

जम्मूमधील जंगलात शस्त्रे लपलेली आढळली
गुरुवारी सैन्य आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. ही शस्त्रे जम्मूच्या रियासी जिल्ह्याच्या जंगलात लपवली होती. जिल्ह्यातील मक्खिदारच्या घनदाट जंगलांमध्ये संशयास्पद कारवायांबाबत बुधवारी सायंकाळी इनपुट प्राप्त झाल्याचे सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, पीर पंजाल रेंजच्या दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!