
स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१६: चीनच्या सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराने मंगळवारी डिसएंगेजमेंटचा एक फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात चिनी सैन्य आपले सामान घेऊन परतताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर चिनी सैन्याने या भागातून त्यांचे बंकर तोडले. तंबू, तोफ आणि गाड्या देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. सुमारे 10 महिने चिनी सैन्याने यावर कब्जा केला होता.
मेपासूनच दोन्ही देशांमध्ये तणाव होता
भारत-चीनमध्ये गेल्या वर्षी मेपासून तणाव होता. 15 जूनला हा वाद विकोपाला पोहोचला होता. ज्यावेळी भारतीय परिसरात घुसलेल्या चीनी सैन्याला रोखण्याच्या प्रयत्नात गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला होता. एवढेच नाही तर, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर फायरिंग झाली होती.

खरेतर सप्टेंबरपासूनच भारताने चीनसोबत डिप्लोमॅटिक आणि मिलिट्री लेव्हलची चर्चा सुरू ठेवली आहे. 9 व्या फेरीतीली चर्चेदरम्यान डिसएंगेजमेंटविषयी वृत्त येत आहेत. मात्र गेल्या आठवड्यात पहिल्यांदा संरक्षण मंत्र्यांनी संसदेत यावर स्पष्टपणे भाष्य केले होते.

एप्रिलपासून आमने-सामने होते सैन्य
चीन आणि भारताचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी एप्रिल-मेपासून आमने-सामने होते. जून 2020 मध्ये गलवानमद्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचेही 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. मात्र त्यांनी ते मान्य केले नव्हते.