फलटण: रिक्षा चालकांना मराठी बोलणे अनिवार्य – आरटीओचा इशारा


फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन टीमचे स्वागत करण्यात आले. रिक्षा चालकांनी पांढरा गणवेश, बॅज वापरणे आणि मराठी बोलणे अनिवार्य असल्याचे आरटीओने सांगितले.

स्थैर्य, फलटण, दि. ०७ जून : फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) नवीन टीमचे फलटणमधील सर्व रिक्षा संघटनांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फलटण तालुक्यामध्ये रिक्षा चालवण्यासाठी चालकांना मराठी भाषा बोलता येणे अनिवार्य असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनराज दाभाडे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गीतांजली काळे यांचे सदस्य उमेश अहिवळे यांनी स्वागत केले.

नियम पाळण्याचे आवाहन

यावेळी धनराज दाभाडे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये सर्व रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच सर्व रिक्षा चालकांनी पांढरा गणवेश आणि बॅज घालूनच रिक्षा चालवावी, तसेच वाहतुकीच्या इतर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. गीतांजली काळे यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी हरीदास अहिवळे, फरांदे, जगताप यांच्यासह फलटणमधील विविध रिक्षा संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!