राज्यात काँग्रेसला पुन्हा क्रमांक एकवर आणणे पटोलेंसमोर आव्हान, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे प्रतिपादन


स्थैर्य, नागपूर, दि.७: मी १९८७ ते ९५ अशी सात वर्षे युवक काँग्रेस आणि २००८ ते २०१५ अशी सात वर्षे प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्या वेळी राज्यात काँग्रेस क्रमांक एकवर होती. आता राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला पुन्हा क्रमांक एकवर आणणे हे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरील माेठे आव्हान आहे, असे रोखठोक प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी “िदव्य मराठी’शी बोलताना केले.

पक्षबांधणी करताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे महत्त्वाचे आहे. नाना पटाेले यांच्यात ती क्षमता आहे. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. सध्याचा काळ जशास तसे वागण्याचा आहे. पूर्वी एक दुसऱ्याचा आदर-सन्मान ठेवून प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. आता हे तारतम्य कोणालाच राहिलेले नाही. शिस्तबद्ध आणि संस्कारी पक्ष असलेल्या भाजपनेही संस्कार गुंडाळून ठेवले आहेत. एकेकाळी स्लेजिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सौरभ गांगुलीनेच रोखले. तिथे विराट कोहली आणि गांगुलीच हवा. तसे भाजपला रोखण्यासाठी नाना पटोलेच हवेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मी अध्यक्ष झालो त्या वेळी संघटनात्मक बांधणी हे माझ्यासमोरील आव्हान होते. कारण, सहा महिन्यांवर लोकसभा व त्यानंतरच्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होत्या. संघटनात्मक बांधणी झालेली नव्हती. ब्लॉक अध्यक्ष, अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष तसेच बूथ कमिट्या नव्हत्या. सुरुवातीचे सहा महिने पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले.

पूर्वीसारखा जिल्हाध्यक्षांचा वचक नाही
तत्कालीन यंत्रणेत जिल्हाध्यक्ष सार्वभौम हाेते. ते म्हणतील ते फायनल होते. पण जिल्हाध्यक्ष सर्वसंमतीने होत नाही. त्यामुळे त्याचा वचक राहत नाही. म्हणून ब्लॉक अध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांनाही अधिकार दिले. ४ ते ५ महिने संघटन मजबूत केले. त्याचा फायदा झाला. लोकसभेच्या राज्यात १३ जागा होत्या. त्या १८ झाल्या. विधानसभेच्या ६४ वरून ८४ झाल्या, तर एनसीपी ७२ वरून ५४ वर आली. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला ब्लॉक अध्यक्षांना बोलवायला सुरुवात केली. प्रदेश युवक काँग्रेसचाही मी सात वर्षे अध्यक्ष होतो. जयंत पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील हे सर्व माझ्या कार्यकारिणीत हाेते हे ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

आता युवक काँग्रेस अलिप्त
युवक काँग्रेस निवडणुकीत झालेल्या बदलामुळे अलिप्त आहे. गावपातळी, तालुका व जिल्हा पातळीवर मतदानाद्वारे अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे ही अलिप्तता आली आहे. या पद्धतीत काही गुणदोष आहेत. इतर संघटनांमध्ये हवा तसा समन्वय नाही. आता पूर्वीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यातून नव्या अध्यक्षांना मार्ग काढायचा आहे. नाना पटोले यांच्यात कौशल्य आणि क्षमता आहे. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. काँग्रेस परत क्रमांक एकवर येण्यास वेळ लागणार नाही…


Back to top button
Don`t copy text!