श्रीमंत मनाचा श्रीमंत राजा : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोविंद मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव, विविध सहकारी संस्थांचे संचालक अशी विविध पदे भुषवणार्‍या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या एकंदर कारकिर्दीचा आढावा घेताना श्रीमंत मनाचा श्रीमंत मनाचा श्रीमंत राजा असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्यांच्या या वाटचालीबद्दल….

राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदापासून श्रीमंत संजीवराजे यांनी फलटणच्या राजकारणात प्रवेश केला. 1990 साली फलटण श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून फलटणच्या राजकीय सारीपाटाचा डाव खर्‍या अर्थाने मांडला. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सार्‍या निवडणुका लिलया पेलल्या. याकामी अर्थातच त्यांना श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत सौ. शिवांजलीराजे यांची मोलाची साथ लाभली. 1990 ते आजअखेर सक्रिय राजकारणात ते सहभागी आहेत. विशेष म्हणजे सर्वच क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. तालुक्यात उगवते युवा नेतृत्व अशी जनसामान्यांवर पडलेली छाप आजही कायम आहे. तसे पाहिले तर त्यांनी आता पुढच्या पिढीकडे सुत्रे सोपवण्यास सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक निवडणुकांमध्ये युवकांना संधी देण्यास ते मागेपुढे पहात नाहीत.

‘गोविंद’मार्फत व्यवसायात पदार्पण – तालुक्यातील शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने 1995 मध्ये गोविंद मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्टची उभारणी केली. सुरुवातीच्या काळात अवघे दोन हजार लिटर दुध संकलन असणार्‍या गोविंदचे आज दीड ते दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. तालुक्यात अगदी हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच दुध संकलन केंद्रे गोविंदमार्फत चालवण्यात येत होती. आज साडेसातशेच्या पुढे दुध संकलन केंद्रे आहेत. फलटण, माण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यातील दुधाचे गोविंदमार्फत संकलन केले जाते. दुग्धव्यवसायात वेळोवेळी होणारे बदल, वाढणारी स्पर्धा आणि शासनाचे दुध पावडर निर्यातीबाबतचे धोरण या सगळ्यांचा मेळ घालत गोविंदने आज तालुक्यातच नव्हे तर देशाच्या नकाशात आपले नाव उज्वल केले आहे. आयएसओ मानांकन, दूध, दूध पावडर आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री यामध्ये गोविंद अग्रेसर आहे. आज गोकुळ, वारणा, चितळे यांच्या जोडीला गोविंदचे नाव घेतले जाते ही फलटणसाठी अभिमानाची बाब आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत कोट्यावधी रुपयांची विकासकामे – जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमार्फत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत राबवून वैयक्तिक, सामाजीक कामाला प्राधान्य देत श्रीमंत संजीवराजे यांनी विकासाची गंगा तालुक्यात आणली आहे. करोडो रुपयांची कामे आजपर्यंत तालुक्यात केलेली आहेत. एवढेच नव्हे तर तालुक्याच्या कोणत्या गावाचे कोणते प्रश्न आहेत. त्यासाठी कशाची गरज आहे, ही कला श्रीमंत संजीवराजे यांना चांगलीच अवगत आहे.

विरोधकांच्या मतदारसंघातील कामांना प्राधान्य – जिल्हा परिषद निवडणुक लढवताना त्यांना प्रत्येक वेळी कट्टर विरोधाला सामोरे जावे लागते. नव्हे त्यांना विरोधक समर्थ असेल तर निवडणूक लढण्यास हुरुप येतो, अशी प्रथा रुढ झाली आहे. अगदी सुरुवातीच्या बरड, गिरवी मतदारसंघामध्ये कितीतरी वर्षे त्यांना माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांच्या विरोधाला शह देउन विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे सध्या निवडून आलेला मतदारसंघातही न्यू फलटणचे सर्वेसर्वा प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या विरोधाला शह दिला हे सर्वश्रुत आहे. विरोधक कितीही सबळ अथवा दुबळा असला तरी त्याला कमी न लेखता त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्याही. परंतु राजकारण फक्त निवडणुकीपुरते त्यानंतर विरोधकांच्या पोटात घुसून त्यांना आपलेसे करण्यातही ते कमी पडले नाहीत. विरोधकांनी सुचवलेली कामे करण्यास त्यांचे नेहमीच प्राधान्य असते. त्यामुळेच निवडणुकीनंतर त्यांच्यासमोर असणारा विरोधक हा विरोधक न राहता त्यांच्या पार्टीतील आहे की काय असे त्यांचे वागणे असते.

श्रीराम कारखान्याला गतवैभव मिळवून देणार – श्रीमंत संजीवराजे यांनी 2000 साली डबघाईला गेलेला किंवा दिवाळखोरीत निघेल की काय अशी शंका असणारा श्रीराम कारखाना चालवायला घेतला. त्यावेळी या कारखान्यास कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हते. परंतु त्याही परिस्थितीत न डगमगता फलटणकरांच्या प्रेमामुळे फलटणकरांना आवाहन करत हा कारखाना यशस्वीपणे चालवला. त्यानंतर आजमितीला हा कारखाना अडचणीतून बाहेर पडू लागला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्याच महिन्यात त्यांनी श्रीरामचे चेअरमनपद सोडले, ही बाब अभिनंदनीयच म्हणावी लागेल. तसे पाहिले तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद हे वर्षासाठीच होते.

दुष्काळात विविध कामे – फलटणच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. परंतु दुष्काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम श्रीमंत संजीवराजे नेहमीच करतात. दर आठवड्याला टंचाई आढावा बैठक, दुष्काळ दौर्‍याचे आयोजन करणे. रोजगार हमी, आवश्यक तेथे टँकर, जनावरांसाठी छावण्या, जलसंधारण, पाझरतलाव, लघुपाटबंधारे अशी कितीतरी कामे त्यांनी दुष्काळात करुन घेतली आहेत. शिवाय जुन्या पाझरतलावांची दुरुस्तीचे काम दुष्काळात बसत नव्हते ते त्यांनी श्रीमंत रामराजे यांच्या सहकार्याने करुन घेतले आणि तालुक्यातील जुन्या पाझरतलावाची दुरुस्ती, गळती काढण्याचे काम केले. प्रादेशिक योजनांबाबतचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.

मालोजीबँकेची जबाबदारी – एकेकाळी गतवैभव अथवा तालुक्याची अर्थवाहिनी असणारी श्रीमंत मालोजीराजे बँक अडचणीत आली असतानाही सभासदांच्या मताचा आदर करुन विलीन न करता ही बँकही आता पुर्वपदावर आणली आहे. यासोबतच श्रीमंत सईबाई महिला सहकारी संस्था आणि नरसोबा ग्रामीण पतसंस्थेचे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.

फलटण एज्युकेशन सोसायटी म्हणजे श्रीमंत संजीवराजेंचा आत्मा – फलटण एज्युकेशन सोसायटी म्हणजे श्रीमंत संजीवराजे यांचा आत्मा आहे, असे म्हणावे वाटते. या सोसायटीमध्ये काम करणार्‍या प्रत्येकाची कुटुंबप्रमुख म्हणून काळजी घेणारा पालनकर्ता अशी भुमिका ते निभावत आहेत. शिवाय या सोसायटीच्या माध्यमातून फलटण व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल, उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण इंजिनियरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशी कितीतरी उदाहरणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष पटवून देतात.

सांस्कृतिक कामातही अग्रेसर – नाईक निंबाळकर देवस्थाने आणि इतर चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे कामही ते ते सांभाळतात. त्याचप्रमाणे राजे ग्रुपद्वारे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. याशिवाय जायंटस ग्रुपसारख्या सामाजीक संस्थेचेही ते सभासद आहेत.

दांडगा जनसंपर्क – वैयक्तिक गाठीभेटी आणि संपर्क यावर त्यांचा भर आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी त्यांनी वैयक्तिक संपर्क ठेवला आहे. ज्या त्या भागात गेल्यानंतर जातीने चौकशी करण्याची त्यांच्या अंगी कला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान त्यांनी मिळवले आहे.

जिथे गर्दी तेथे ‘बाबा’ – सरोज व्हिला, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, गोविंद मिल्क यापैकी कोणत्याही ठिकाणी कार्यकर्त्यांचा गराडा असला की समजावे येथे ‘बाबा’ आहेत. त्यामुळे ते आहेत किंवा नाहीत यासाठी वेगळी खास चौकशीची गरज पडत नाहीत. सर्वसामान्यांचे आधारवड, तारणहार अशा कितीतरी उपाधी त्यांच्यासाठी तोकड्याच पडतील. आपल्या अंगी असणार्‍या या गुणांबाबत त्यांना कधीही गर्व नाही. उलट केलेल्या कामांचे श्रेय ते कार्यकर्त्यांना देण्यासही मागेपुढे पहात नाहीत. कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कामे मार्गी लागल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगीतले आहे.

मालोजीराजेंचा वारसा आणि रामराजेंचे मार्गदर्शन – गेल्या 25 वर्षांपासून काम करत असताना आपल्याला श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी, श्रीमंत शिवाजीराजे यांच्या आशीर्वादामुळे आणि वारशामुळे तसेच खासदार शरद पवार, आमदार अजितदादा पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळेच आपण हे काम करु शकतो, याचा ते वारंवार उल्लेख करतात.

पुढच्या पिढीही सक्षम – सध्या गोविंद मिल्कच्या माध्यमातून त्यांनी आपले चिरंजीव श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांना गोविंद डेअरी त्याचप्रमाणे कुरोली फूडस याद्वारे व्यवसायात सक्रिय केले आहे. आगामी काळात पंचायत समिती अथवा नगरपरिषद याद्वारे राजकारणातही सक्रिय करतील यात शंका नाही.

आज साजर्‍या होणार्‍या वाढदिवसाबद्दल दैनिक स्थैर्यमार्फत लक्ष लक्ष शुभेच्छा !

श्रीमती उमा रुद्रभटे, फलटण


Back to top button
Don`t copy text!