सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असणारे; श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. 09 ऑक्टोबर 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । आज (दि.9 ऑक्टोबर) सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजे फलटण तालुक्यातील दमदार नेता. पद असो वा नसो, कायम सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असणार्‍या श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याचा आजच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने घेतलेला थोडक्यात आढावा…..

मुरब्बी राजकारणी

फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव हे कायमच चर्चेत असते. एकदम शांत, संयमी व मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ओळख तालुक्यासह जिल्ह्यामध्ये आहे. फलटण तालुक्यातील कोणत्याही नागरिकांचे काम असो; त्यांनी ते काम जर श्रीमंत संजीवराजेंना सांगितले तर सदर काम हे तातडीने मार्गी लागले जाते. श्रीमंत संजीवराजे यांना तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकारी वर्ग सुद्धा दबकूनच असतो. यामुळेच श्रीमंत संजीवराजे हे तालुक्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्त्व आहे.

उत्कृष्ट व्यावसायिक

ज्या प्रमाणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राजकारणात मुरब्बी राजकारणी आहेत. त्याच प्रमाणे ते उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा आहेत. फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांनी फलटणसारख्या निमशहरी भागामध्ये गोविंद मिल्क या उद्योगाची स्थापना केली. श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतृत्त्वाखाली आज गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् या उद्योगाचा विस्तार अगदी सातासमुद्रापार परदेशातही झाला आहे. शिवाय या उद्योगाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील शेतकर्‍याला शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करण्याची संधी मिळाली असून आज तालुक्यातील असंख्य दुध उत्पादक शेतकरी ‘गोविंद’ मुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. तालुक्यातील युवकांना गोविंदच्या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार संधीही उपलब्ध झाल्या आहेत. याचे सर्वश्री श्रेय हे श्रीमंत संजीवराजे यांचेच आहे.

कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याची ताकद

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यामधील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून जाऊन सर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तालुक्यामधील कोणताही असा मतदारसंघ नाही कि, त्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे यांनी निवडणूक लढवली नाही किंवा त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्याचे सर्वमान्य नेतृत्व असल्याने जिल्हा परिषदेच्या कोणत्याही गटातून निवडून येण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.

तालुक्याची संपूर्ण माहिती

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात असल्याने त्यांना फलटण तालुक्यामध्ये पूर्ण वेळ देता येत नाही. परंतु ते नाहीत म्हणून कोणतेही काम रखडू नये किंवा प्रलंबित राहू नये याची पूर्ण जबाबदारी ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेली आहे. फलटण तालुक्यामधील प्रत्येक गावामधील प्रत्येक वस्ती असो वा घर असो याची संपूर्ण माहिती श्रीमंत संजीवराजे यांना आहे. तालुक्यामध्ये कोणते विकासकाम कधी झालेले आहे ? कोणती विकासकामे प्रगतीपथावर आहेत ? कोणती विकासकामे प्रस्तावित आहेत ? याची संपूर्ण माहिती श्रीमंत संजीवराजे यांना कायमच असते. किंबहुना तालुक्यामध्ये कुठे काय झालेले आहे व कुठे काय करायचे आहे हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तोंड पाठ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पदाला प्रतिष्ठा निर्माण करणारे नेत्तृव

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कोणत्याही पदावर असूदेत त्या पदाला विशेष प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम नेहमीच त्यांनी केलेले आहे. राजकारणाच्या सुरवातिच्या काळामध्ये श्रीमंत संजीवराजे हे फलटण पंचायत समितीचे सभापती होते. त्यावेळी फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे करत सभापती पदाला त्यांनी वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानंतर ते कायमच जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद असो वा अध्यक्षपद या दोन्ही पदांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याच कारकीर्दीत स्वच्छ भारत अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावर सातारा जिल्ह्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुमान मिळालेला आहे.

‘बाबा आमदार व्हावेत’ ही अनेकांची इच्छा

श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याचा झपाटा, तालुक्यावरची राजकीय पकड, प्रश्‍नांची योग्य जाण व त्यांच्या सोडवणूकीचे सामर्थ्य आणि असंख्य कार्यकर्त्यांची पाठीशी असलेली फौज हे सर्व नेतृत्त्वगुण उपजत लाभलेले श्रीमंत संजीवराजे आमदार व्हावेत अशी एक ना अनेक केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचीही इच्छा आहे. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या भक्कम साथीने हे अशक्यही नाही. त्यामुळे श्रीमंत संजीवराजे यांना विधीमंडळात जाण्याची संधी लवकरच मिळावी, अशी मनोकामना आजच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने व्यक्त होणे क्रमप्राप्तच ठरेल.

अश्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाच्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ! आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे, संपादक, दैनिक स्थैर्य.


Back to top button
Don`t copy text!