‘मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात, आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही’- मुख्यमंत्री


 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या
दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच, मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ‘मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात
असून, ही लढाई आम्ही जिंकणारच’, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
तसेच, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागून
देणार नाही’, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

उद्धव
ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची
फौज जशीच्या तशी आहे. भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेले नाही. ही लढाई लढत
असताना मध्येच कुणी टुमणे काढले इतर समाजाचे आरक्षण काढणार का, असे
प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण
देताना अन्य कुठल्याही समाजाचे आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, असे
उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

कुंडल्या बघणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे चिमटे

महाविकास
आघाडी सरकार पडणार, असे म्हणनाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी चांगलाच
समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘आम्ही सर्व आरोपांना उत्तर दिली आहेत. पण
आता कुणाला मानगुटीवरच बसायचे असेल तर त्याला काय करणार ? गेली वर्षभर
आमच्या कुंडल्या बघितल्या गेल्या. तुमच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, असे
सांगितलं गेले. सरकार पाडण्याचे मुहूर्तही काढले गेले. पण कुंडल्या बघणारे
आज आमच्या वर्षपूर्तीचे पुस्तक वाचत आहेत’, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

‘फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा’

यावेळी
मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
यांच्यानाही टोमणे लगावले. फडणवीस दिल्लीत गेले पाहिजे. त्यांचा अभ्यास
चांगला आहे. ते देशाचा विचार करतात. मोठा विचार करतात. त्यांनी दिल्लीत
जावे, अशी मुनगंटीवार यांची इच्छा आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढताच
सभागृहात एकच हशा उडाला.

मेट्रो मुद्द्यावरुन टीकास्त्र

यावेळी
मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ‘आज
मेट्रोला विरोध केला जात आहे. मोक्याच्या जागेवर मेट्रो बांधली जात आहे
म्हणून टीका होतेय. मागणी नसताना कांजूरमार्गमध्ये कारशेड होत असल्याचीही
टीका केली जात आहे. कारशेडची मागणी नव्हती म्हणणाऱ्यांनी बुलेट ट्रेनची तरी
मागणी होती का ते सांगावे? बुलेट ट्रेनची मागणी कुणी केली होती? कुणीच
नाही. आपल्याला किती स्टेशन मिळणार आहेत? तर फक्त चारच आणि अहमदाबादला
महाराष्ट्रातून किती लोक जाणार आहेत? असे सवाल त्यांनी केला. तसेच,
कारशेडमध्ये मिठाचा खडाच नव्हे तर मिठागरही टाकू नका, असा टोलाही
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!