दैनिक स्थैर्य | दि. १३ जून २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचा वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. के सामी रेड्डी, संचालक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक प्रबंधन संस्था, बारामती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण तसेच श्री. आर. एच. पवार, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. हेमंत रानडे, कोषाध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, डॉ. व्ही. डी. काकडे, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय अजैविक प्रबंधन संस्था, बारामती कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केली.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा पिढीसाठी असणारे विचारमंथन व समायोजन, करिअरमधील व भविष्यातील विचारविनिमय, बदलत्या विश्वानुसार असणार्या भविष्यातील संधी, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची प्रशासनातील व कृषि व्यवसायातील यशाची वाटचाल, उद्यान शास्त्र व कृषि शास्त्राचे महत्व व आधुनिक काळातील संधी, सध्याचे जागतिक तापमान बदलाचे आवाहन, मानव जातीची वैचारिक उत्क्रांती व बदलता निसर्ग, कृषितील कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग या विषयवार मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे आवाहन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विविध स्तरावरील स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह, पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कुमारी रीतिषा दातार, अध्यक्ष, विध्यार्थी परिषद २०२२-२३ तसेच कृषि महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कुमारी पूजा चौधर, अध्यक्ष, विध्यार्थी परिषद २०२२-२३ यांनी सविस्तर वाचन केले. यानंतर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्षामधील चार महिने कालावधीतील होणारे विविध प्रकल्पाचे व शेतकरी कार्यक्रमाचे न्यूजलेटर अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. के सामी रेड्डी, संचालक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक प्रबंधन संस्था, बारामती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच उच्चशिक्षणातील सध्याची परिस्थिती, कृषीतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधी, परिश्रमातून मिळणारे यश, प्रात्यक्षिक ज्ञान सुधारणा व राष्ट्रीय अजैविक प्रबंधन संस्था, बारामती तर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे इन प्लांट ट्रेनिंग याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य रासकर व आभार प्रदर्शन प्रा. सौरभ निकम यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सांस्कृतीक विभाग, प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.