निर्बंधाच्या काळात कराड जनताचा बेबंद कारभार; कर्जाच्या वसुलीला बगल


 

स्थैर्य, कऱ्हाड, दि.१७: रिझर्व्ह
बॅंकेने निर्बंध घालूनही बेबंद कारभार केल्याने कराड जनता सहकारी बॅंक
दिवाळखोरीत गेली. कर्जाची वसुली मागे ठेवत नको त्या केलेल्या उलाढाली अधिक
धोक्‍याच्या ठरल्या. त्यात मागील तारखांना एन्ट्री करून खात्यावरील रक्कम
परस्पर फिरवणे, ठरवून दिलेल्या मर्यादाचे पालन न करणे, बेहिशोबी कर्ज माफ
करणे, व्याजात नको इतकी सवलत देणे अशा कारभारामुळे कराड जनता बॅंकेचे
आर्थिक दिवाळे निघाले. संचालक मंडळाला हाताशी धरून तर कधी त्यांच्या
सहमतीशिवाय झालेला कारभार अधिक गुंतागुतीचा ठरला. त्यामुळे एकूण एनपीए
वाढला. त्याचा डोंगर अखेर धोक्‍याचा ठरला. 

कराड जनता बॅंकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याला अनेक कंगोरे आहेत. त्या
सगळ्याचा परामर्श घेतल्याने रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरी जाहीर केली.
बॅंकेवर सप्टेंबर 2016 रोजी पहिला निर्बंध लावला. त्या वेळी बॅंकेला अनेक
ठेवी घेणे, कर्ज देणे यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले होते. मात्र,
त्यातील एकही गोष्ट पाळली गेली नाही. याउलट निर्बंधाच्या काळात जनताचा
कारभार अतिशय बेबंद असल्याचे ताशेरे रिझर्व्ह खात्याने ओढले आहेत. बॅंकेला
2016 मध्ये खात्यावरील मर्यादा घालून दिल्या होत्या. त्यात वैयक्तिक
खात्यावर 4 कोटी, तर ग्रुपच्या खात्यावर 10 कोटी 84 लाखांची उलाढाल,
व्यवहारास परवानगी होती. मात्र, त्या मर्यादा संचालक मंडळाने पाळल्या तर
नाहीतच त्याशिवाय त्या मर्यादा स्वयंघोषितपणे संचालकांच्या बैठकीत त्यांनी
वाढवल्या. ती मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या मर्यादांच्या दुप्पट
केली. 

त्यात वैयक्तिक उलाढाल 8, तर ग्रुपच्या उलाढालीला 21 कोटींची परवानगी दिली,
तीही रिझर्व्ह बॅंकेने अवैध ठरवत त्यावर ताशेरे ओढले, बॅंकेला दंडही केला.
बॅंकेचा बेबंद हिशोबाच्या कारभारला बेलगामपणा आल्याने बॅंक अधिक आर्थिक
गर्तेत सापडली. त्यामध्ये अनेक खात्यांच्या व्यवहारावर रिझर्व्ह बॅंकेचे
ताशेरे आहेत. त्या खात्यांची पडताळणी करून त्यातील अवैधपणा रिझर्व्ह
बॅंकेने प्रकाश झोतात आणला. बॅंकेच्या जुन्या खात्यापैकी ब्राईट
ऍल्युमिनिअम या खात्यातील कर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्याचे स्पष्ट झाले
आहे. 

समारंभावरही मोठा खर्च 

कराड जनता बॅंकेला वकील फी, समारंभावर खर्च करू नये,
असे स्पष्ट निर्देश होते. मात्र, ती गोष्टही बॅंकेला सांभाळता आली नाही.
निर्बंध असतानाही सातारा शाखेचा समारंभ थाटामाटात घेतला होता. त्यावरही
रिझर्व्ह बॅंकेने आक्षेप नोंदवत ताशेरे ओढले. त्याशिवाय वकिलांची फी
देतानाही कोणतीही फिकीर न करतो लाखो रुपये फी चुकीच्या पद्धतीने दिल्याचा
उल्लेख रिझर्व्ह बॅंकेने केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!