ढेबेवाडी विभागावर गांधील माशांचे सावट; महिंदमधील दुर्घटनेनंतर वन विभागाकडे तक्रारींचा ओघ


 


स्थैर्य, ढेबेवाडी, दि.१७: महिंद (ता. पाटण) येथे गांधील
माशांच्या हल्ल्यात दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यापासून
विभागातील अनेक गावांतील पडक्‍या घरात आणि झाडांवर बांधलेली परंतु
आतापर्यंत फारशी गांभीर्याने न घेतलेली गांधील माशांची घरटी दहशतीची ठिकाणे
बनली आहेत. या संदर्भातील वन विभागाकडे तोंडी तक्रारी येत असल्याचे
सांगण्यात येत आहे. 

महिंद येथे घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर गांधील
माशांनी केलेल्या हल्ल्यात दोघींचाही मृत्यू झाल्याची घटना ता. 26
ऑक्‍टोबरला घडली होती. लगतच असलेल्या पडक्‍या घरातील गांधील माशांच्या
पोळ्याला झाडावर उड्या मारणाऱ्या वानरांचा धक्का लागल्याने हा प्रकार
घडल्याचे त्यावेळी समोर आले होते. गांधील माशांनी बांधलेली गोल व उभट
आकाराची अनेक घरटी परिसरातील काही गावांतील झाडांवर तसेच पडक्‍या घरात असून
आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली अशी घरटी महिंदची घटना घडल्यापासून दहशतीची
ठिकाणे बनली आहेत.

महिंदच्या घटनेनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथील गांधील माशांचे घरटे
हटविले. त्यासाठी वणवा विझविताना वापरला जाणारा पोशाख वन कर्मचाऱ्यांनी
वापरलेला होता, तरीही त्यावेळी दोघा कर्मचाऱ्यांना माशांनी चावा घेऊन जखमी
केले होते. आता इतर गावांतूनही वन विभागाकडे अशा घरट्यांबाबत तोंडी तक्रारी
येत आहेत. काळगाव, उमरकांचन व कुंभारगाव येथे भरवस्तीत गांधील माशांची
पोळी आढळून आल्याने आणि त्या परिसरात वानरांच्या कळपांचाही वावर असल्याने
नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!