दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२४ | फलटण |
अनन्यभावाने भक्ती करणार्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणार्या आणि ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, असे अभिवचन देणार्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन सोहळा ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या नामघोषात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
मंगळवार, दि. ९ एप्रिल (गुढीपाडवा) रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक व अभिषेक झाल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. सकाळी ९ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. रात्री हभप संतोष महाराज भालेराव, अकोला यांचा भारूडाचा कार्यक्रम (विनोदी व धार्मिक नाथ पारंपरिक) पार पडला.
बुधवार, दि. १० एप्रिल २०२४ रोजी श्रींचा ‘प्रकट दिन’ मुख्य दिवस सकाळी श्रींना अभिषेक व अभिषेक झाल्यानंतर श्रींची आरती भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या गाभार्याची आकर्षक अशा फुलाफळांनी सजावट करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या रक्तदान शिबिरात अनेक स्वामी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभाग घेतला. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक अशी भेटवस्तू तसेच रोप देण्यात आले.
सकाळी १० वाजता सद्गुरू हरिबाबा सांप्रदायिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता श्रींची महाआरती आरती झाल्यानंतर ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या नामघोषात अहिल्यानगर दुमदुमले व फुलांची उधळण करण्यात येऊन उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. सायंकाळी ५.०० वाजता ‘ॐ दत्त चिले ओम’ भजनी मंडळाचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी श्रींची महाआरती झाल्यावर प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री १० वाजता श्री स्वामी समर्थ एक तारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दोन दिवस चाललेल्या या प्रकट दिन सोहळ्याने अहिल्यानगर स्वामीमय झाले होते.