तंत्रज्ञान शाश्वत विकासासाठीच असावे – डॉ. व्ही. एन. शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास होत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भावी पिढीवर विपरीत परिणाम न होता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा निसर्गाच्या संवर्धनासाठी झाला पाहिर्जेें असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयाच्या ‘इन्वेंशन, इनोव्हेशन अँड इंक्युएशन सेंटर’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे होते.

भारतामध्ये जी प्राचीन ज्ञानसंपदा आहे, ती अधिक नैसर्गिक असून तिचा वापर तंत्रज्ञानाबरोबर झाला पाहिजे. निसर्ग हा मानवाला अनेक संकेत देत असतो, अनेक आदिवासी जमाती आपले नैसर्गिक जीवन जगत असताना निसर्गाच्या संकेतानुसार त्यांचे कार्य चालते. त्यामुळे विकासामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे पूर्वी येत नव्हते. आजचे तंत्रज्ञान जे भाकीत वर्तवते तितकेच तंतोतंत किंबहुना त्यापेक्षा अचूक भाकीत पशूपक्षी, प्राणी, वृक्ष यांच्यामाध्यमातून होत असते. त्या प्राचीन आणि पारंपरिक ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज असून ती नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केंद्रस्थानी आहे. महाविद्यालय स्तरावर अशा प्रकारची संशोधन केंद्रे स्थापन होऊन इनव्हेंटर इन्क्युलेटर तयार व्हावेत व युवक स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायात उतरावेत, अशी अपेक्षा डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रारंभी स्वागत केल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार स्पर्धेच्या तज्ज्ञांचे व विविध विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या सहभागी विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे यांनी शाश्वत विकास ही काळाची गरज असून आज नैसर्गिक संसाधनांचा उचित वापर केला गेला पाहिजे, अन्यथा येणार्‍या पिढीला त्याचे परिणाम सोसावे लागतील. आज शिक्षण क्षेत्रातही शाश्वत शिक्षणाची गरज ओळखून बदल झाले पाहिजेत. शिक्षणक्षेत्राचा उद्योग व्यवसायाशी संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. उद्योग व्यवसायांनी शिक्षण संस्थांना त्यांना आवश्यक असणार्‍या संशोधनासाठी आपल्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिल्यास उद्योगक्षेत्राचा नक्कीच फायदा होईल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी प्रास्ताविक करून ‘इंक्युबॅशन सेंटर’ ही नवीन शैक्षणिक धोरणाची गरज असून विद्यार्थ्यांना संशोधनविषयक पदवी प्राप्त करण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल व शाश्वत विकासासाठी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने व विविध देशांनी जी उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती गाठण्यासाठी त्या त्या स्थानिक भागातील समस्यांचा विचार करून संशोधन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून अतिथींचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, तसेच निवृत्त प्राध्यापक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्राध्यापक पी. आर. रत्नपारखे, महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ.टी. पी. शिंदे तसेच विविध महाविद्यालयातून आलेले तज्ज्ञ प्राध्यापक, अविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व प्राध्यापकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निवेदन डॉ. एस. सी. जगताप व प्रा. एल. सी. वेळेकर यांनी केले तर आकाश जाधव यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!