विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आले पाणी


स्थैर्य, चंदिगड, दि.१०: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. या कामकाजादरम्यान मुख्यमंत्री एका घटनेविषयी बोलताना भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. (chief minister cry in assembly during budget session)

‘मी टीव्ही बघत होतो. टीव्हीवर बघितले हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता भूपेंद्र सिंह हुड्डा एका ट्रॅक्टरवर बसले होते. ट्रॅक्टरला रश्शी (जाड दोरखंड) बांधली होती. काँग्रेसच्या महिला आमदार रश्शी हातात धरुन ट्रॅक्टर ओढत होत्या. हे दृश्य बघून दुःख झाले…’; असे सांगत असताना हरयाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेता मनोहर लाल खट्टर भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

अश्रू पुसत पुसत खट्टर म्हणाले, सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन होता. संपूर्ण जग हा दिवस साजरा करत होते. विधानसभेतही दिवसभराचे कामकाज महिलांशी संबंधित विषयांना प्राधान्य देऊन करण्याचा निर्णय झाला. पण इथले कामकाज संपवून घरी गेलो, टीव्ही लावला तर हे दृश्य बघितले. वेठबिगार मजुरांपेक्षा महिलांची वाईट अवस्था दुःख झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले. महिला दिनी माजी मुख्यमंत्र्यांची ही कृती बघून मनाला वेदना झाल्याचे खट्टर म्हणाले.

महागाईच्या मुद्यावर आंदोलन सुरू होते. या आंदोलनासाठी महिला ट्रॅक्टरवर बसल्या असत्या आणि हुड्डा यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार टॅक्टर ओढत आहेत, असे दिसले असते तर मी समजू शकलो असतो; असेही मुख्यमंत्री खट्टर म्हणाले. राज्यातील महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर हुड्डा यांनी लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने हरयाणा-दिल्ली सीमेवर अनेक महिला खुल्या आकाशात जमिनीवर बसल्या आहेत. या महिलांकडे बघून मुख्यमंत्र्यांना दुःख होत नाही का?, असा सवाल हुड्डा यांनी केला. पाठोपाठ काँग्रेस आमदार किरण चौधरी आक्रमक झाल्या. राज्यातील महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी महिलांशी संबंधित गुन्हे कमी व्हावेत यासाठी सरकार काय करत आहे?, असा सवाल चौधरी यांनी केला.

काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव पडला

हरयाणाच्या विधानसभेत मंगळवारी महिलांच्या मुद्यावर थोडा वेळ आजी-माजी मुख्यमंत्र्यांची जुगलबंदी झाली. यानंतर बुधवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात सरकार अपयशी ठरले, असा आरोप करत काँग्रेसने हरयाणातील मनोहर लाल खट्टर यांच्या सरकार विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला होता. पण पुरेसा पाठिंबा मिळाला नाही आणि अविश्वासदर्शक ठराव फेटाळला गेला. हरयाणाच्या ९० सदस्यांच्या विधानसभेत सध्या ८८ आमदार आहेत. दोन जागा रिक्त आहेत. मतदानाच्यावेळी सरकारला ५५ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर अविश्वास प्रस्तावाला फक्त ३१ आमदारांनी पाठिंबा दिला. यामुळे खट्टर सरकार सुरक्षित राहिले.

…म्हणून MSP मिळणे अशक्य

देशात वेगवेगळ्या सरकारी योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांचे सरकार किमान आधारमूल्य देऊन (MSP – Minimum Support Price) धान्य खरेदी करते. पण ही खरेदी सरकारी आवश्यकतेचा विचार करुन केली जाते. अनेकदा राजकीय सोयीसाठी सरकारी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी होते. पण सरसकट सगळे धान्य खरेदी केले जात नाही. तसे करणे अशक्य आहे. किमान आधारमूल्य देण्याचा अर्थात MSPचा कायदा केला तर तर सरकारला अर्थसंकल्पातील इतर तरतुदी करणे बंद करावे लागेल. सध्या भारतात साधारणपणे दीड लाख कोटी रुपयांची धान्य खरेदी होते. पण किमान आधारमूल्य देण्याचा अर्थात MSPचा कायदा केला तर देशातील सरसकट सर्व धान्य खरेदी करण्यासाठी किमान १७ लाख कोटी रुपयांची तरतूद दरवर्षी करावी लागेल. केंद्र सरकारचे सध्याचे बजेट जेमतेम २७-२८ लाख कोटींचे आहे. दरवर्षी या बजेटमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम फक्त धान्य खरेदीसाठी वापरली तरी देशात इतर कोणत्याही योजना राबवणे शक्य होणार नाही. सगळा कारभार ठप्प होईल, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!