‘दैनिक स्थैर्य’ इम्पॅक्ट: लक्ष्मीनगरमधील सांडपाणी प्रश्नाची दखल; चेंबर साफ करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश

फलटणमधील लक्ष्मीनगर येथे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याच्या बातमीची ‘दैनिक स्थैर्य’ने दखल घेतल्यानंतर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. ११ जुलै : फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील स्टेट बँक शेजारी गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे हाल होत असल्याच्या वृत्ताची ‘दैनिक स्थैर्य’ने प्रभावीपणे दखल घेतली होती. या बातमीचा इम्पॅक्ट झाला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि नगरसेवक संदीप चोरमले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

चेंबर तातडीने साफ करण्याचे निर्देश

अक्षत प्लाझा आणि स्टेट बँक शेजारील ड्रेनेज चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. यामुळे पसरलेल्या दुर्गंधीचा नागरिकांना आणि दुचाकीस्वारांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या बातमीची दखल घेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी त्वरित लक्ष घालत संबंधित चेंबर तातडीने साफ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पाईपलाईन बदलण्याचे आश्वासन

ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यांत येथील ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यात येईल, असे आश्वासन समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले. त्यांच्या या तत्पर कारवाईमुळे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, ‘दैनिक स्थैर्य’ने मांडलेल्या प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button
Don`t copy text!