कर फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार करावी; तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार : नगराध्यक्ष समशेरसिंह

फलटण नगरपरिषदेतील कर घोटाळ्याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुराव्यासह तक्रार करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व प्रशासनाने केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जुलै : फलटण नगरपरिषदेच्या वसुली विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर, फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुराव्यानिशी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून या घोटाळ्यात सहभागी तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.

बोगस पावत्यांची तपासणी

काही कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना बोगस पावत्या दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. ज्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कर भरला आहे, त्यांनी आपल्या पावत्यांची खात्री करून घ्यावी. जर ती पावती बोगस आढळली, तर त्याबाबत त्वरित नगरपरिषदेकडे तक्रार दाखल करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कर बुडवणाऱ्या घरमालकांवर कारवाई

शहरात अनेक मिळकतधारकांनी घरामध्ये भाडेकरू ठेवले आहेत. मात्र, कायदेशीर भाडेकरार न करता स्वतः राहत असल्याचे दाखवून त्यांनी कमी घरपट्टी लावून घेतली आहे. अशा प्रकारे नगरपरिषदेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कर चुकवणाऱ्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांची चौकशी

हा आर्थिक अपहार केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून तत्कालीन मुख्याधिकारी आणि तत्कालीन पदाधिकारी यांच्या संगनमताने हा मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता तत्कालीन अधिकाऱ्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!