
फलटण नगरपरिषदेच्या वसुली विभागातील भ्रष्टाचार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उघड केला आहे. कर्मचाऱ्यांनी घोटाळ्याची लेखी कबुली दिली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ जुलै : फलटण नगरपरिषदेच्या वसुली विभागात नागरिकांकडून कर गोळा करून तो स्वतःच्या खिशात घालण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मोठा भ्रष्टाचार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पुराव्यानिशी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी गठीत केलेल्या चौकशी समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी करप्रणालीच्या सॉफ्टवेअरमधून पावत्या डिलीट करून पैसे लाटल्याची आणि लाच घेतल्याची धक्कादायक लेखी कबुली दिली आहे.
कराच्या पैशांवर थेट डल्ला
नगरपरिषदेच्या वसुली विभागातील काही कर्मचारी नागरिकांकडून मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम रोख स्वरूपात जमा करून घेत होते. मात्र, ही रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात जमा न करता ते स्वतःच्या खिशात घालत होते. तसेच, नागरिकांना करात मोठी सवलत देण्याचे आमिष (उदा. एक लाखाचा कर ५० हजारांत कमी करणे) दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती. एका नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार समोर आला.
कर्मचाऱ्यांचे धक्कादायक लेखी जबाब
या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी लेखी जबाब दिले आहेत. एका जबाबात मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी, भाडेकरूंची नोंद कमी करणे आणि मूल्यांकनाची कामे करण्यासाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंत लाच घेतल्याचे एका कर्मचाऱ्याने मान्य केले आहे. तर दुसऱ्या एका जबाबात, नगरपरिषदेच्या ‘महानेट’ (MahaNet) सॉफ्टवेअरचा गैरवापर करून पावत्या डिलीट करणे आणि रोख रकमेचा अपहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांची नावेही उघड झाली आहेत.
दोषींवर थेट गुन्हे दाखल करणार
गेल्या अनेक वर्षांपासून फलटण नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनली होती. मात्र, फलटणच्या जनतेच्या घामाचा पैसा शहराच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतली आहे. या प्रकरणात जे कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करून प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
पाणीपुरवठा घोटाळ्याचाही पर्दाफाश
काही दिवसांपूर्वीच पाणीपुरवठा विभागातून एका खाजगी कंपनीला कोणत्याही नोंदीशिवाय दररोज हजारो लिटर पाणी दिले जात असल्याचा प्रकार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उघडकीस आणला होता. गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारानंतर संबंधित कंपनीने थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासोबतच नगरपरिषदेतील वर्षानुवर्षांचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षांनी कडक पावले उचलल्याचे या सलग दोन कारवायांमधून स्पष्ट झाले आहे.
